यावल : शहरातील एका एजन्सीचे सेल्समन ग्रामीण भागातून पैसे वसुली करून शहरात येत असताना सातोद-यावल रस्त्यावर दोन अज्ञात चोरट्यांनी सेल्समनच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्यांच्याजवळील रोख रकमेसह मोबाईल, सिमकार्ड असे ५५ हजार ३६४ रुपयांचा ऐवज असलेली बॅग घेऊन फरार झाले. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील दहिगाव येथील केशव रामदास पाटील (वय ३५) हे शहरातील सचिन एजन्सी येथे एका खासगी कंपनीत सेल्समन म्हणून काम करतात. ते मंगळवारी या कंपनीचे मोबाईल फोन, रिचार्जचे ग्रामीण भागातील पैसे गोळा करण्यास गेले होते. दुपारी एक वाजता ते सातोदवरून दुचाकी क्रमांक एमएच-१९-एएस- २६२३ द्वारे यावलला येत होते.
दरम्यान, बांधेल नाल्याजवळ रोडच्या कडेला एक इसम काटेरी झुडूप तोडून ओढत रोडवरून घेऊन जात होता म्हणून त्यांनी दुचाकी हळू केली. तेव्हा त्याच वेळी मागून दुसरा इसम आला व त्याने केशव पाटील यांच्या डोळ्यात लाल मिरचीची भुकटी टाकली आणि त्यांच्याजवळील ५२ हजार ३६४ रुपये रोख रक्कम, तीन हजार रुपये किमतीचे मोबाईल व सिमकार्ड असलेली रेक्झिनची बॅग घेऊन ते फरार झाले. यात काटेरी फांदी रस्त्यावर टाकणारा अंगात पांढऱ्या रंगाचा फुल बाहीचा शर्ट, पॅन्ट तर डोळ्यात मिरची टाकणाऱ्याने अंगात लालसर रंगाचा फुल बाहीचा शर्ट घातलेला होता. दोघे ३० ते ३५ वयोगटातील होते. तेव्हा या दोन अज्ञातांविरुद्ध यावल पोलिसांत जबरी लूटप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहे. एकंदरीत, दिवसाढवळ्या अशाप्रकारे झालेल्या रस्त्यात लूटमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.