जळगाव : शहरातील उपनगर असलेल्या पिंप्राळा व मेहरुणमध्ये शनिवार दि.२२ एप्रिल रोजी भवानी मातेचा जयघोष करीत मोठ्या उत्साहात बारागाड्या ओढण्यात आल्या. पिंप्राळ्यात महामार्गाच्या पुलापासून तलाठी कार्यालयापर्यंत ८ मिनिटांचा थरार नागरिकांनी अनुभवला. दोन्ही ठिकाणी अखंडपणे बारागाड्या ओढण्याचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील या दोघांच्या प्रभागात एकाच दिवशी बारागाड्यांच्या कार्यक्रमाचा योग जुळून आला.
पिंप्राळ्यात गेल्या ६७ वर्षांपासून अक्षय्य तृत्तीयेला बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यंदादेखील शनिवारी ग्रामस्थांतर्फे भवानीदेवीच्या यात्रोत्सवात बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उत्सवाच्या दिवशी दुपारी देवताना आवतन देण्यात आले. त्यानंतर वाजतगाजत भगत हिलाल बोरसे यांच्यासह भक्तांनी ध्वजासोबत भवानी मातेच्या मंदिराला अकरा प्रदक्षिणा घातल्या. माजी पोलीस पाटील विष्णू पाटील यांच्याहस्ते बारागाड्यांचे पूजन व नारळ वाढविण्यात आले.
त्यानंतर रेल्वे उड्डानपुलाजवळून ६.२० वाजता बारागाड्या ओढायला सुरुवात झाली. अवघ्या आठ मिनिटांत ६.२८ वाजता भगत हिलाल बोरसे यांनी तलाठी कार्यालयापर्यंत गाड्या ओढून नेल्या.हा थरार पाहताना अनेकांच्या अंगावर शहारे उभे राहिले होते. उत्सवाच्या पूर्वसंध्येला हिलाल बोरसे यांच्या घरी भगतकाठीची स्थापना करण्यात येते. यावेळी आमदार सुरेश भोळे, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.