योगेश देऊळकार, जयदेव वानखडे / लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव जामोद: भेंडवड येथील घटमांडणीच्या भाकितानुसार जून महिन्यात कमी पाऊस पडेल. तो सार्वत्रिक नसेल. स्वरूपाचा महिन्यात 'सार्वत्रिक' पेरणी त्यामुळे या जुलै महिन्यामध्ये सर्वसाधारण पाऊस होणार नाही. पडेल. ऑगस्ट महिन्यामध्ये प्रचंड पाऊस पडेल तर अनेक ठिकाणी अतिवृष्टी होऊन महापूर तर सप्टेंबर महिन्यात कमी पावसाळा राहील. परंतु अवकाळी पावसाचे प्रमाण जास्त राहील. त्यामुळे अनेक भागांत पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होईल. घटामधील घागरीमध्ये भरपूर पाणी आढळले. त्यावरून पाणीटंचाई फारशी जाणवणार नसल्याचे संकेत देण्यात आले आहे.
राजा कायम राहील...
पानसुपारी घटामध्ये कायम होती. परंतु गादीवर म्हणजे पानावर माती दिसून आली. त्यावरून देशाचा राजा कायम राहील. राजाला राजकीय, आर्थिक, नैसर्गिक तसेच परकीय शत्रूंच्या संकटांचा मोठा ताण येईल. देशात निर्माण होणाऱ्या नैसर्गिक परिस्थितीला राजाला तोंड द्यावे लागेल. त्यामुळे राजा तणावात राहील. तसेच आर्थिक व्यवस्थेचे प्रतीक असलेली करंजी फुटलेली आढळून आली. त्यामुळे यावर्षीसुद्धा अर्थव्यवस्थेवर ताण येईल. नैसर्गिक, आर्थिक संकटामुळे देश आर्थिक संकटात सापडेल, असे भाकित करण्यात आले आहे.
पीक परिस्थिती साधारण, जून महिन्यात सार्वत्रिक पेरणीची शक्यता कमी
विदर्भातील प्रमुख पीक म्हणजे कपाशी. हे पीक यावर्षी कमी-अधिक प्रमाणात चांगले येईल, भावात चढ-उतार होईल. ज्वारीचे पीक साधारण चांगलं येईल. भावात तेजी राहील. तूर पीक चांगले सांगितले. या पिकाचे उत्पादन अनिश्चित राहील. भावातही तेजी-मंदी राहील. मूग मोघम असल्याने पीक साधारण येईल. परंतु, भावात मात्र तेजी राहणार आहे. उडीद पीक सुद्धा चांगले येईल. या पिकाला भाव साधारण मिळेल. तीळ पिकाची खूप नासाडी होईल, बाजरी मोघम तर मटकी, जवस आणि तांदूळ हे पीक सर्वसाधारण सांगितले आहे. मात्र, कुठे चांगले तर कुठे नासाडीची शक्यता आहे. लाख आणि वाटाणा ही दोन्ही पिके मोघम सांगितली. त्यामुळे पिके चांगली येतील, परंतु उत्पन्नात अनिश्चितता असेल. गहू या धान्याच्या दाणा बाहेरच्या दिशेने सरकल्यामुळे हे पीक चांगले येईल. भावामध्येही चढाव राहील. तर हरभरा पीक साधारण चांगले येईल. अशाप्रकारे खरीप आणि रब्बी हंगामांतील पीक परिस्थिती साधारण स्वरुपाची वर्तविण्यात आली आहे. तर पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी सांगितली. भाकीत ऐकण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तथा विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांतून शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली होती.
अशी केली घटमांडणी...
- अक्षय तृतीयेला सायंकाळी चंद्रभान महाराजांचा जयजयकार करीत घटमांडणी करण्यात आली. यावेळी घटामध्ये अंबाडी, कपाशी, ज्वारी, तूर, मूग, उडीद, तीळ, भादली, बाजरी, मटकी, तांदूळ, जवस, लाख, वाटाणा, गहू, हरभरा, करडी आणि मसूर अशी अठरा प्रकारची धान्य गोलाकार मांडण्यात आली.
- घटाच्या मधोमध खड्डा खोदून त्यामध्ये पावसाळ्याच्या चार महिन्यांचे प्रतीक असलेली चार मातीची ढेकळे ठेवण्यात आली. आणि त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवण्यात आली. घागरीवर पृथ्वीचे प्रतीक असलेली पुरी आणि चारा-पाण्याचे प्रतीक असलेले सांडोळी, कुरडई, पापड ठेवण्यात आला.
- बाजूला खाणार म्हणजे चवीचे प्रतीक भजे आणि वडा ठेवण्यात आला. तर घागरीच्या बाजूला राजा आणि राज्याची गादी म्हणजेच पान-सुपारी ठेवण्यात आली. रात्रभर कुणीही या घटकाकडे फिरकले नाही. त्यानंतर आज सकाळी सूर्योदयापूर्वी घटाचे सूक्ष्म निरीक्षण करत त्यामध्ये रात्रीदरम्यान झालेल्या बदलावरून भाकीत वर्तविले.