भुसावळ, जि.जळगाव : येथील महत्त्वाकांक्षी अमृत योजनेतील प्रभाग तेरामध्ये १५ लाख लीटर पाण्याच्या क्षमतेच्या जलकुंभाचे भूमिपूजन नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यातून ४० हजार नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे.शहरातील नागरिकांचे पुढील ५० वर्षातील पाण्याचा प्रश्न सोडविणाऱ्या अमृत योजनेतून शहरात ११ जलकुंभांची निर्मिती होणार आहे. त्यापैकी प्रभाग १९मध्ये दत्तनगर काशीविश्वेश्वर मंदिराजवळ १०.१२ लाख लीटर पाण्याची क्षमता, प्रभाग २३ रॉकेल डेपोजवळ ११.१० लाख लीटर पाण्याची क्षमता, प्रभाग आठमध्ये ११.२० लाख लीटर पाण्याची क्षमता अशा तीन जलकुंभांच्या प्रत्यक्ष कामाच्या सुरुवातीनंतर प्रभाग तेरामध्ये सुमारे ४० हजार नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सोडविणाºया १५ लाख लीटर पाण्याच्या क्षमतेचे जलकुंभाचे भूमिपूजन करण्यात आले. यातून प्रभागातील मोहम्मदी नगर, रामदास वाडी, मिल्लत नगर, गोपाळनगर, गुंजाळ कॉलनी, लक्ष्मी नगर, गांधीनगर, गडकरीनगर, रिंग रोड, भवानीनगर, बस डेपोमागील भाग, सरस्वतीनगर या सर्वांची सोय होणार असून, भविष्यात पाण्याचा प्रश्न नेहमीसाठी सुटणार आहे.शहराला पाणीपुरवठा करणारे सध्याचे दोन्ही जलकुंभ ब्रिटीशकालीन असून, कालबाह्य झालेले आहेत. शहराचा विस्तार पाहता महत्त्वाकांक्षी अमृत योजनेतून ११ जलकुंभ तयार होणार आहेत. याप्रसंगी माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, प्रमोद सावकारे, गटनेते मुन्ना इब्राहिम तेली, नगरसेवक अशोक नागरानी, पुरुषोत्तम नारखेडे व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.अमृत योजनेतून पण प्रभाग तेरामध्ये १५ लाख लीटर क्षमता असलेले जलकुंभाचे भूमिपूजन झाले. यातून शहरवासीयांची पाण्याची बिकट समस्या सुटण्यास मदत होणार आहे.-रमण भोळे, नगराध्यक्ष, भुसावळसुमारे ४० हजार नागरिकांना यातून दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत होती. वेळेप्रसंगी टँकरद्वारे पाण्याची उपाययोजना करून पाणीप्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सुरू असतो. जलकुंभातून प्रभागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे- राजेंद्र आवटे, माजी नगरसेवक, भुसावळ
अमृत योजना जलकुंभाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 4:19 PM