जळगाव : घरात वास्तुदोष असल्याने पूजा करावी लागणार असल्याचे सांगत सोन्याचे दागिने घेऊन दोन वर्षांपासून पसार झालेला भोंदूबाबा हरीष ऊर्फ हरी गुलाब गदाई (रा. देवगाव राजापूर, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) याला शनिपेठ पोलिसांनी अटक केली. पहूर येथून मुद्देमालासह रविवार, १८ फेब्रुवारी रोजी त्याला ताब्यात घेतले.
आसोदा रोड परिसरातील रहिवासी छाया रतन बाविस्कर यांच्याकडे २६ जानेवारी २०२२ रोजी असलेल्या पूजेच्या ठिकाणी सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याच्या बाळ्या ठेवल्या होत्या. तिथे भगवे कपडे घालून एक भोंदूबाबा आला. तुमच्या घरात वास्तुदोष असल्याने पूजा करावी लागणार असल्याचे सांगितले. महिलेने त्यावर विश्वास ठेवत चहा बनविण्यासाठी त्या घरात गेल्या. त्याच वेळी भोंदूबाबाने पूजेत ठेवलेले २५ हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन पसार झाला होता. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याचा तपास सुरू असताना सदर भोंदूबाबा पहूर परिसरात असल्याची माहिती शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकातील पोउनि योगेश ढिकले, पोहेकॉ परिष जाधव, राहुल पाटील, राहुल घेटे, अनिल कांबळे, भागवत शिंदे यांना कारवाईसाठी पहूर येथे रवाना केले. पथकाने रविवार, १८ फेब्रुवारी रोजी रात्री भोंदूबाबा हरीष ऊर्फ हरी गुलाब गदाई याला मुद्देमालासह अटक केली आहे.
पाच दिवसांत तीन गुन्हे उघडशनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या तीन गुन्ह्यांचा चार दिवसांत शनिपेठ पोलिसांनी छडा लावला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली शनिपेठ पोलिसांनी १४ फेब्रुवारी रोजी घरफोडीप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी भोंदूबाबा तसेच गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्याला अटक केली.