लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दीर्घ प्रतीक्षेनंतर बीएचआर या पतसंस्थेचे सील उघडले खरे, मात्र कार्यालयाच्या आतमध्ये वाळवीचे साम्राज्य दिसून आले. कागदपत्रे व फर्निचर वाळवीने खाल्ले असून यामुळे अवसायकांसमोर पुन्हा अडथळे निर्माण झाले आहेत. पदभार घेतल्यापासून अवसायकांना अडथळ्यांची शर्यत करावी लागत आहे.
दरम्यान, पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे एक पथक पुण्याला रवाना झाले असून दोन पथके जळगावात ठाण मांडून आहेत. या पथकाकडून नेमकी काय चौकशी केली जात आहे, याबाबत गोपनीयता पाळली जात आहे. या गुन्ह्याच्या तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक सुचेता खोकले यांना विचारले असता, कागदपत्रांचे काम सुरू आहे, इतकेच त्यांनी सांगितले. अधिकची माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. अजिंठा शासकीय विश्रामगृहावर हे पथक आपले काम करीत आहे. गुरुवारी मुख्य कार्यालयात हे पथक आले नसल्याची माहिती अवसायक चैतन्य नासरे यांनी दिली. दरम्यान, दुसरीकडे या गुन्ह्यात धरम सांखला याला पुणे विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
हार्ड डिस्कसाठी पत्रव्यवहार
या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी जप्त करून नेलेल्या हार्ड डिस्क परत मिळाव्यात यासाठी अवसायक चैतन्य नासरे यांनी पोलिसांकडे पत्रव्यवहार सुरू केला आहे. आतादेखील पुणे पोलिसांनी संस्थेच्या कार्यालयात पंचनामा केला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कार्यालय बंद असल्याने संपूर्ण कार्यालयात फर्निचर व कागदपत्रांच्या गठ्ठ्यांना वाळवी लागलेली आहे. सहा महिन्यांपासून बोरिंग बंद असल्याने त्यातून पाणीदेखील येत नाही त्यामुळे कार्यालयाची स्वच्छता करायला अडचणी निर्माण झाल्या आहेत.