लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ठेवीदारांची फसवणूक व अपहार प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीएचआर या पतसंस्थेचे सील केलेले मुख्य कार्यालय उघडण्याचे आदेश पुणे न्यायालयाने ५ मे रोजी दिलेले असले तरी अद्यापही पोलिसांनी सील काढलेले नाही. दरम्यान, कार्यालयाच उघडलेले नसल्याने नव्याने नियुक्त झालेल्या अवसायकांना काम करता येत नाही. त्यामुळे ते हतबल झाले आहेत, दुसरीकडे ठेवीदारही प्रतीक्षा करीत आहेत.
पुणे येथील सेवानिवृत्त शिक्षिका रंजना घोरपडे यांच्या फिर्यादीवरून डेक्कन पोलीस ठाण्यात २५ नोव्हेंबर रोजी अवसायक जितेंद्र कंडारे व इतरांविरुद्ध अपहार व फसवणुकीतचा गुन्हा दाखल झाला आहे. घोरपडे व त्यांची बहिण या दोघींनी गुंतवणूक केलेले १६ लाख ९० हजार १४२ रुपये संस्थेने परत केलेले नाहीत. तीन दिवस तपास चालल्यानंतर डिसेंबर महिन्यात पुणे पोलिसांनी व संस्थेचे मुख्य कार्यालय सील केले होते.
५ मे रोजी दिले सील उघडण्याचे आदेश
ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत संस्थेचा व्यवहार पूर्ववत सुरू व्हावा यासाठी शासनाने कंडारे यांच्या जागी शासनाने नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे सहायक निबंधक असलेले चैतन्य नासरे यांची अवसायक म्हणून या पतसंस्थेवर नियुक्ती केली. नासरे यांनी पतसंस्थेचे कार्यालय उघडण्यासाठी पुणे न्यायालय व पोलिसांकडे पत्रव्यवहारावर केला. संस्थेचे कार्यालय उघडण्याचे आदेश न्यायालयाने पाच मे रोजी पोलिसांना दिले.११ मे रोजी न्यायालयाच्या आदेशाची प्रत ऑनलाइन काढण्यात आली. १२ मे रोजी अवसायक नासरे यांनी तपासाधिकारी तथा पोलीस निरीक्षक सुचेता खोकले यांच्याकडे आदेशाची प्रत पोहचवली. त्यावर कोरोनाचे कारण सांगून १८ मेपर्यंत जळगावात येणे शक्य नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मे महिना संपण्यात आला तरी सील उघडण्यात आले नाही. दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासाधिकारी तथा पोलीस निरीक्षक सुचेता खोकले यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
कोट....
कार्यालयाचे सील उघडण्याबाबत पुणे न्यायालयाने ५ मे रोजीच आदेश दिले आहेत. पोलिसांना आदेशाची प्रत दिली आहे. जोपर्यंत सील उघडले जात नाही, तोपर्यंत कामकाज करताच येणार नाही. तीन वेळा नागपूरहून जळगावात आलो. परत पोलिसांकडे पाठपुरावा केला जाईल.
- चैतन्य नासरे, अवसायक, बीएचआर