जळगाव : बीएचआरमधील अपहार व फसवणूक प्रकरणात अटक केलेल्या सनदी लेखाधिकारी धरम किशोर सांखला (४०,रा.शिव कॉलनी), महावीर मानकचंद जैन (३७,रा.गुड्डूराजा नगर),ठेवीदार संघटनेचा अध्यक्ष विवेक देविदास ठाकरे (४५,रा.देवेंद्र नगर) सुजीत सुभाष बाविस्कर (वय ४२, रा.पिंप्राळा) व कंडारेचा वाहन चालक कमलाकर भिकाजी कोळी (२८,रा.के.सी.पार्कमागे, जळगाव) या पाच जणांची रविवारी पुणे न्यायालयाने कारागृहात रवानगी केली.
संशयितांच्या पोलीस कोठडीची मुदत रविवारी संपली. त्यामुळे त्यांना रविवारी पुणे न्यायालयात हजर करण्यात आले होते.
न्या.एस.एस.गोसावी यांच्या न्यायालयात सकाळी ११ ते दुपारी अडीच असे साडेतीन तास कामकाज चालले. अटकेतील आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळावी म्हणून तपास यंत्रणेने मागणी केली होती, मात्र न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर वकिलांनी संशयित आरोपींच्या जामीनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर न्यायालयाने पोलिसांचा अभिप्राय मागविला आहे. त्यामुळे या पाचही संशयितांची कारागृहात रवानगी झाली. सरकारकडून ॲड.प्रवीण चव्हाण तर बचावपक्षातर्फे ॲड.उमेश रघुवंशी यांनी बाजू मांडली. दरम्यान, या गुन्ह्यात अवसायक जितेंद्र कंडारे, उद्योजक सुनील झंवर, आकाश माहेश्वरी, प्रकाश वाणी, कुणाल शहा व योगश सांखला आदींना अद्याप अटक झालेली नाही.