लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जलसंधारण महामंडळाच्या अंतर्गत तब्बल १३ कोटींच्या बंधाऱ्यांना मान्यता मिळाली असून, यात धरणगाव तालुक्यातील अंजनविहिरे येथे दोन सिमेंट बंधाऱ्याच्या कामांना सोमवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
जलसंधारण महामंडळ, औरंगाबाद यांच्या अंतर्गत १३ कोटी रुपयांच्या बंधाऱ्याच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यातील विविध कामांना प्रारंभ करण्यात येत आहे. त्याअंतर्गत अंजनविहिरे येथील कामांचे भूमिपूजन गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला जि. प. सदस्य गोपाल चौधरी, पंचायत समिती माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, पं. स. सदस्य प्रेमराज पाटील, गजानन पाटील, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील, सरपंच डॉ. विलास चव्हाण, उपसरपंच उमेश पाटील, पोलीस पाटील रवींद्र पाटील, शाखाप्रमुख बाळू पाटील, सचिन बोरसे, रोहिदास पाटील, प्रमोद पाटील, प्रकाश पाटील यांची उपस्थिती होती. दरम्यान, जलसंधारण महामंडळाच्या अंतर्गत तब्बल १३ कोटींच्या बंधाऱ्याच्या कामांमध्ये धरणगाव तालुक्यातील- बोरखेडा, अंजनविहिरे, सोनवद आणि हिंगोणा, तर जळगाव तालुक्यातील-डोमगाव, बिलवाडी, म्हसावद, विटनेर, दापोरा, जवखेडा, जळगाव खुर्द आणि निमगाव येथील गावांमधील बंधाऱ्यांचा समावेश आहे.