जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील खोटेनगर ते पाळधी बायपास व अजिंठा चौफुली ते तरसोद प्रवेशद्वारपर्यंत नूतनीकरणाचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शनिवारी सकाळी बांभोरी प्र.चा. आणि खोटेनगर स्टॉप येथे करण्यात आले.
जळगाव शहरातून जाणाऱ्या सुमारे आठ किलोमीटर मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ हा पाळधीतून एक मार्ग वळवण्यात येत आहे. उर्वरित सुमारे ४ किलोमीटर रस्त्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. या सोबतच या मार्गावरील वीज खांब व इतर उपकरणांचेही स्थलांतर करण्यात येणार आहे. या दोन्ही कामाचे भूमिपूजन शनिवारी झाले. या दोन्ही कामांसाठी १२ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून याचे काम सुरू करण्यात आले आहे.
यावेळी महापौर भारती सोनवणे, माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, मनपा गटनेते सुनील महाजन, जि.प.सदस्य प्रताप पाटील, गोपाल चौधरी, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, नगरसेवक कैलास सोनवणे, मनोज चौधरी, प्रशांत नाईक, अमर जैन, गणेश सोनवणे, श्याम कोगटा उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन पं.स. सभापती मुकुंद नन्नवरे यांनी केले. आभार सा.बां.चे शाखा अभियंता जितेंद्र महाजन यांनी मानले.