जळगाव: आज शिवस्मारकाचे भुमीपूजन झाले. तीन महिन्यात पुतळा उभारला जाईल. तेव्हा उद्घाटनासाठी पुन्हा पिंप्राळ्यात येऊ, हा माझा शब्द आहे, अशा शब्दात शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जळगावकरांना रविवारी आश्वस्त केले. अलीकडेच खारघरमध्ये उष्माघातामुळे काही जणांचा जीव गेला, त्यामुळे येथील दुपारचे भाषण टाळले असे स्पष्ट करुन जळगावकरांची दिलगिरीही व्यक्त केली.
जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक साकारले जात आहे. त्याचे भूमिपूजन खासदार राऊत यांच्या हस्ते रविवारी दुपारी झाले. या सोहळ्यासाठी उध्दव ठाकरे स्मारकाच्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी पत्नी रश्मी ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार, अरविंद सावंत, महापौर जयश्री महाजन, गोव्याचे संपर्क प्रमुख जीवत कामत, जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय सावंत, गुलाबराव वाघ, विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे आदी उपस्थित होते. कुलभूषण पाटील यांनी उध्दव व रश्मी ठाकरे यांचा सत्कार केला.
खारघरच्या घटनेमुळे शासनाने दुपारी १२ ते सायंकाळी ५ यावेळेत सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घातली आहे. लोकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी हा कार्यक्रम एक दिवस आधी सायंकाळी करण्याबाबत सूचीत केले होते. मात्र ऐकेल तो शिवसैनिक कसा? असे सांगत शिवसैनिकांच्या आग्रहास्तव दुपारच्या कार्यक्रमाला आलो. पण पुढे तीन महिन्यात पुतळ्याचे काम पूर्ण झाल्यावर सायंकाळीच कार्यक्रमाचे चांगले नियोजन करु, तेव्हा नक्की येईल, हा माझा शब्द आहे, या शब्दात त्यांनी आश्वस्त केले. उष्माघातामुळे दुपारच्या कार्यक्रमांना बंदी, विमानाचे लँडीग व टेकऑफ याच्या तांत्रिक अडचणी या कारणामुळे पिंप्राळ्यात सभा होऊ शकली नाही. दहा मिनिटासाठी ठाकरे आले त्यानेच शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.