पिलखोड, ता. चाळीसगाव : चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावरील पिलखोड हे मध्यवर्ती मोठे गाव असून या गावी सर्वोदय शिक्षण प्रसारक संस्थेची पिलखोड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नावीन्यपूर्ण अशा इमारतीच्या वास्तूचा शुभारंभ लवकरच करू, असे उद्गार संस्थेचे नवीन नवनिर्वाचित अध्यक्ष विकास पाटील यांनी काढले.
पिलखोड येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व प्राध्यापक यांनी आयोजित सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते. पाटील यांनी आपल्या भाषणात येत्या २ वर्षांत इमारतीचे काम सर्व संचालक मंडळाच्यामार्फत करून विद्यार्थ्यांना त्या वास्तूत ज्ञानार्जनाचे योगदान देऊ, असे शेवटी सांगितले. नवनिर्वाचित अध्यक्ष विकास पाटील, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सचिव उदेसिंग पाटील व सर्व संचालक मंडळ यांचा मुख्याध्यापक तुकाराम बोरसे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. संचालक योगेश भोकरे यांनी नवीन वास्तूसाठी २१ हजारांची देणगी जाहीर केली.
याप्रसंगी योगेश भोकरे, सुरेश सोनवणे, भगवान राजपूत, संजय पाटील, मुख्याध्यापक तुकाराम बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रशांत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन फकिरा चव्हाण यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पाटील यांनी संचालकांचा सत्कार केला. आभार प्रदर्शन वासुदेव बाविस्कर यांनी केले.