उत्तम काळे।भुसावळ : सर्वाधिक लक्षवेधी असलेल्या भुसावळ विधानसभा मतदारसंघात भाजपने तयारी सुरू केली असली तरी अन्य पक्षांकडून अद्याप उमेदवार निश्चित न झाल्याने शोध सुरू आहे. विकास कामांचे उद्घाटन, जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन करीत इच्छुकांकडून सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे.भुसावळ विधानसभा मतदारसंघ २००९ साली अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. त्यावेळेपासून मतदारसंघात प्रत्येक वेळेस इच्छुकांची भाऊगर्दी होऊ लागली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना आमदार संजय सावकारे यांनी विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्याचा सपाटा सुरू केला आहे. तर इतर राजकीय पक्षांकडून निवेदने देणे व आंदोलन करणे सुरू असल्याचे दिसून येत आहे.२००९ साली विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर या मतदारसंघातून शिवसेनेकडे त्यावेळी तब्बल ३० ते ३५ इच्छुक उमेदवारांची यादी होती. मात्र त्यावेळी शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यात अॅड. राजेश झाल्टे यशस्वी झाले होते. राष्ट्रवादीची उमेदवारी तत्कालीन आमदार संतोष चौधरी यांनी त्यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे संजय सावकारे यांना मिळवून दिली होती. व विजय मिळवण्यात यशस्वी झाले होते . २०१४ साली मात्र परिस्थिती अगदी वेगळी झाली होती. शिवसेनेचे पराभूत उमेदवार अॅड. झाल्टे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली होती. आमदार सावकारे हे भाजपची उमेदवार घेऊन रिंगणात उतरले होते. या निवडणुकीतही त्यांनी यश मिळवले होते.आघाडी व युतीवरही चित्र अवलंबून असून यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षाचे अधिकृत उमेदवार कोण? याबाबत सध्यातरी संभ्रम आहे. शिवसेनेतर्फे अद्याप उमेदवार पुढे आलेले नाहीत. पीपल्स रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (पीआरपी)चे नेते जगन सोनवणे हे विविध प्रश्न हाती घेऊन आंदोलन करीत आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे तसेच आरपीआयचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी हे देखील आंदोलनांद्वारे लक्ष वेधून आहेत. २०१४ साली विधानसभा निवडणुकीमध्ये भुसावळ विधानसभा मतदारसंघातून अकरा उमेदवार रिंगणात होते.पक्षनिहाय इच्छुक उमेदवारभाजपआमदार संजय सावकारे यांचेच भाजपकडून नाव आहे. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या आरपीआय (आठवले गट ) पक्ष भुसावळची जागा मिळावी त्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या पक्षाकडून रमेश मकासरे तसेच राजू सूर्यवंशी हे इच्छुक आहेत.कॉँगे्रस व अन्य पक्षराष्ट्रवादीसोबतच बहुजन वंचित आघाडीकडूनही अॅड.राजेश झाल्टे यांचे प्रयत्न आहे. भारिप-बहुजन महासंघातर्फे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, कॉँग्रेसतर्फे संजय ब्राह्मणे, डॉ . वैशाली गाढे - सोनार तर पीआरपीकडून जगन सोनवणे हे निवडणूक रिंगणात येण्याची शक्यता आहे.राष्टÑवादी कॉँग्रेसया पक्षाकडून गेल्या वेळी अॅड. राजेश झाल्टे यांना उमेदवारी मिळाली होती. यावेळीदेखील पक्षाकडून अॅड.राजेश झाल्टे तसेच उल्हास पगारे हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.
भुसावळ : भाजपची तयारी, अन्य पक्षांकडून उमेदवाराचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 9:22 PM