लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : येथे घरफोड्यांचे सत्र सुरुच असून सलग चौथ्या दिवशी चोरट्यांनी बंद घरातून १ लाख १० हजार लाख रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ केल्याची घटना शहरातील प्रभात कॉलनी भागात ११ रोजी घडली. याबाबत शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वृत्त असे की, प्रशांत भरतराव बेहेेरे हे शहरातील पवन नगर, प्रभात कॉलनी परीसरात कुटुंबासह राहतात. सेंट्रल बँक भुसावळ शाखेत ते व्यवस्थापक आहेत.
दरम्यान, बेहरे हे कामानिमित्त कुटुंबासह नाशिक येथे गेले असल्याची संधी चोरट्यांनी साधली. घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी बेडरूममध्ये असलेल्या कपाटातून ५५ हजारांची रोकड, दोन तोळे वजनाचे ५५ हजार रुपये किंमतीचे दागिने, ५ हजार रुपयांचे सहा भार चांदीचे दागिने, लेडीज पर्स व फोर व्हिलरची चावी लांबवली. ९ ते १० जानेवरी दरम्यान ही घरफोडी झाल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे पो.नि. निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी भेट देवून पाहणी केली. तपास सहा.निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहेत.
दरम्यान विमल पाटील नगरात ही ९ रोजी शनिवारी रात्री चोरटे एका घरात प्रवेश करत असताना नागरिकांच्या लक्षात येताच चोरट्यांनी तिथून पळ काढला होता अन्यथा याठिकाणी ही चोरीची घटना घडली असती.
चोरीची पद्धत सारखीच
८ रोजी ॲड. योगेश बाविस्कर तसेच ९ रोजी शिवदत्त नगरातील रेल्वे कर्मचारीच्या घरी व बँक व्यवस्थापकाच्या घरी झालेल्या झालेल्या चोरीची पद्धत सारखीच असून चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त करून मिळेल ती रक्कम लांबवली.