भुसावळ : कोरोनाचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी प्रत्येकाने लस घेणे आवश्यक आहे. याबाबत व्यापक स्वरूपात जनजागृती सुरू असून तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने लसीकरण करावे या उद्देशाने शहरात डी.एस. हायस्कूलमध्ये नवीन लसीकरण केंद्राची सुरुवात करण्यात आली. यात १८ वर्षांवरील वयोगटाच्या लसीकरणासाठी स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात आले आहे, मात्र ‘सर्व्हर डाऊन’च्या तांत्रिक कारणामुळे अनेकांना लस न मिळाल्यामुळे हिरमोड झाला.
तब्बल तीन तास रांगेत उभे राहावे लागल्यामुळे एका तरुणीस भोवळ येऊन ती कोसळली होती.
नवीन केंद्रावर पाण्यासह इतर भौतिक सुविधा पुरवण्यात याव्यात, अशी मागणी आता पुढे आली आहे.
कोरोनापासून बचाव व्हावा याकरिता प्रत्येक व्यक्ती लस घेण्यासाठी सद्य:स्थितीत इच्छुक असताना दिसत आहे, मात्र एकाच वेळी उसळलेल्या अलोट गर्दीमुळे ज्या उद्देशाने कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस घेण्यात येणार आहे ते साध्य न होता, उलट गर्दीमुळे कोरोना तर होणार नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे.
शहरात प्रथमच एका दिवसाला तब्बल १ हजार ९४४ जणांचे लसीकरण झाले.
लसीकरण व्यापक प्रमाणात व्हावे याकरिता १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी आरोग्य विभागाने डी.एस. हायस्कूलमध्ये स्वतंत्र केंद्र सुरू केले आहे. याकरिता शहरातील पाच आरोग्य केंद्रांतून सकाळी टोकन घेतल्यानंतर नागरिकांनी थेट लसीकरण केंद्र गाठले होते. आरोग्य विभागाने यापुढे नियोजनपूर्ण भौतिक सुविधेसह जास्त गर्दी होणार नाही याप्रमाणे नियोजन करून लसीकरण करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.