भुसावळ : येथील ३२ वर्षीय कय्युम खान हा राष्ट्रीय एकात्मता तसेच स्वच्छतेचा संदेश यासाठी भुसावळ येथून काश्मीर ते कन्याकुमारी सफरसाठी दुचाकीद्वारा भारतभ्रमण करणार आहे. तो ७ रोजी भुसावळ येथून निघेल.४८ मोटारसायकल रायडर्स काश्मीर ते कन्याकुमारी या तब्बल आठ हजार कि.मी. अंतराची रायडींग १६ दिवसात पूर्ण करण्यासाठी लेह येथून १६ सप्टेंबरला सफरीला सुरूवात करणार आहेत व २२ सप्टेंबरला कन्याकुमारी येथे पोहचणार आहे. यासाठी जळगाव जिल्ह्यातील चार जणांचा समावेश आहे. यात मेकॅनिकचा काम करणारा भुसावळचा कय्युम खान (३२) याचा समावेश आहे.हा युवक भुसावळ येथील गांधी पुतळ्यापासून ७ सप्टेंबरला सुरुवात करून १३ रोजी लेह येथे मोहीमेसाठी पोहोचणार आहे. तसेच कन्याकुमारी येथूनदेखील मोटारसायकलने भुसावळला पोहोचणार आहे. या मोहिमेतून महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, राजस्थान, दिल्ली, आसाम या राज्यातील एकूण ४८ मोटारसायकल चालक स्वच्छता एकात्मता व शांती असे छापील संदेश देत जनजागृती करणार आहे.या मोहिमेबद्दल माहिती देतांना कय्युम खान याने सांगितले की, ७ सप्टेंबरला भुसावळहुन मी गांधी पुतळा येथून सुरुवात करणार असून जळगावहून प्रवीण पाटील, हिमांशू शिरसाळे व हर्षल तावडे साथीला असतील. मालेगाव, सटाणा, कळवणमार्गे सापुतारा येथे गुजरात रायडर्स मॅनिया संस्थेच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दिल्यावर बडोदा, अहमदाबाद, उदयपूर, लुधियाना,जम्मू, सोनमार्ग, कारगिलमार्गे लेहला पोहोचणार आहे. सापुतारा येथे मुंबईचे एक रायडर आम्हाला सोबतीला जुडतील. कारगिल स्मृतिस्थळाला भेट दिल्यानंतर लेहला जाणार आहेत. कन्याकुमारीहुन मी एकटाच मोटरसायकलवर भुसावळला बंगलोर, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद मार्गे परतणार आहे. संपूर्ण प्रवासात रस्ते सुरक्षा, शांती व एकात्मता स्वच्छता हाच संदेश देणार आहे. आजपर्यंत देशात एवढ्या मोठ्या संख्येने मोटरसायकल मोहिमेचे आयोजन करण्यात आले नाही म्हणून लिम्का बुक आॅफ इंडिया व इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड याची नोंद करणार आहे.वयाच्या पाचव्या वर्षापासून सायकलिंगचा छंद होता वडील निजाम खान हे स्वत: सायकल रेसर असल्याने त्यांनी पाठबळ दिले आहे, असे कय्युमने सांगितले.या भ्रमणासाठी तो प्रती दिवसाला ६०० कि.मी.अंतर पार करणार आहे. दरम्यान कयूम याने २०१७ वर्षात ही नदी स्वच्छ रहावी तसेच नदी वाचवा या संदेशासाठी १५ हजार कि.मी.चा मार्गक्रमण ४२ दिवसात पुर्ण केला होता. यात कोटेश्वर नारायण सरोवर, लेह लदाख, अरुणाचल प्रदेश तेजू, कन्याकुमारी येथे तो नदी वाचवण्याचा व स्वच्छ राहावी यासाठी दुचाकी द्वारे भ्रमण करून संदेश दिला होता. हे प्रेरणा कमला त्याचे गुरू रायडर अफजलखान यांच्याकडून मिळाली आहे.
राष्ट्रीय एकात्मता व स्वच्छतेचा संदेश घेऊन भुसावळचा कय्युम काश्मीर ते कन्याकुमारी प्रवासासाठी जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 12:53 AM