वासेफ पटेलभुसावळ : लॉकडाऊन काळात भुसावळ डाक विभागातर्फे २६ हजारांपेक्षा अधिक ग्राहकांना घरपोच सेवेचा लाभ मिळाला आहे.लॉकडाऊन काळात भुसावळ डाक विभागातील सर्व उप डाकघरे, शाखा डाकघरे व भुसावळ प्रधान डाकघर व विभागीय कार्यलय येथील कर्मचारी यांनी जनतेला जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याअंतर्गत डाक विभागांतर्गत येत असलेल्या ७ तालुक्यांमध्ये (भुसावळ, जामनेर, यावल, मुक्ताईनगर, रावेर, चोपडा, बोदवड) पोस्टमनच्या सहाय्याने इंडिया पोस्ट पेमेंटस्ी बँकेमार्फत बँक ग्राहकांना फक्त आधार क्रमांक व मोबाईलच्या (एईपीएस) आधारे त्यांच्या कोणत्याही बँक खात्यातून रक्कम काढण्याची निशुल्क सुविधा उपलब्ध करून दिली. विशेष म्हणजे शहरात व खेडेगावातच नव्हे तर आदिवासी पाड्यावरसुद्धा ग्रामीण डाक सेवक यांच्यामार्फत घरपोच सुविधा दिली जात आहे. या काळात २६ हजारांपेक्षा अधिक एईपीएस व्यवहारांतून ७.११,००,००० हून अधिक रकमेचे वितरण करण्यात आले.लॉकडाऊन दरम्यान डीओपी/आयपीपीबीचे योगदान : भारतीय डाक विभाग व इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक यांनी बँकिंगपासून वंचित अशा अगदी दुर्गम भागातसुद्धा अखंडित सेवा देण्याचे व सर्व बँकिंग सुविधा पुरवण्यासाठी अनेक उपाय केले आहेत.लॉकडाऊनमुळे लोकांच्या हालचालींवरील निर्बंध लक्षात घेता, आयपीपीबीआणि इतर बँकेचे ग्राहक जवळच्याच टपाल कार्यालयात किंवा पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक यांच्यामार्फत स्वत:च्या घरीच बँकिंग सेवा मिळवू शकतात. कोविडच्या अलीकडील आव्हानांच्या पार्श्वभूमीवर ग्राहक आपल्या घरातच मोबाइल बँकिंग अॅपद्वारे सर्व बँकिंग सेवा वापरू शकतात.ग्राहकांनी डाक विभागामार्फत देण्यात येत असलेल्या सेवाचा जवळील पोस्ट आॅफिसेसमधून जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक पी.बी.सेलुकर यांनी केले आहे.
लॉकडाऊन काळात भुसावळ डाक विभागातर्फे २६ हजारावर ग्राहकांना घरपोच सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 3:41 PM