काथार युवा वाणी समाजाच्या अध्यक्षपदी राजेश वाणी
जळगाव : कथार-कंठहार युवा वाणी समाज सेवा संघाच्या अध्यक्षपदी सुभाष वाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी सुनील वाणी, सचिवपदी गणेश डाळवाले आणि कोषाध्यक्षपदी शंकर वाणी यांची निवड करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष प्रशांत वाणी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन झालेल्या निवड सभेला योगेश वाणी, उदय वाणी, अजय कामळसकर, अमोल वाणी, मनीष वाणी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सानुग्रह अनुदानाबाबत रिक्षा संघटनांची बैठक
जळगाव : राज्य शासनातर्फे रिक्षा चालकांना दीड हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. त्याबाबत जिल्हा प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्या सोबत शहरातील विविध रिक्षा संघटनांच्या पदाधिकारी यांच्याशी बैठक झाली. या बैठकीत लोही यांनी ऑनलाईन अर्जाबाबत माहिती दिली. तर नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियनचे अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांनीही रिक्षा चालकांना नियमानुसार अर्ज करण्याचे आवाहन केले.
मालाच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र हेल्पलाईनची सुविधा
जळगाव : महामंडळातर्फे माल वाहतुकीच्या सेवेला जास्तीत प्रतिसाद मिळावा, तसेच व्यापाऱ्यांना तात्काळ ही सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी महामंडळातर्फे ०२२ - २३०२४०६८ या क्रमांकाची हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. हा हेल्पलाईन क्रमांक प्रत्येक माल वाहतुकीच्या वाहनांवर टाकण्यात येणार आहे. जे नागरिक, व्यापारी या क्रमांकावर संपर्क साधतील, त्या व्यापारी किंवा उद्योजकाचा मोबाईल क्रमांक संबंधित कार्यक्षेत्रातील माल वाहतूक कक्षाच्या प्रमुखाला कळविला जाईल. त्यानंतर माल वाहतूक कक्ष प्रमुखाने त्या व्यापाऱ्याशी संपर्क साधून त्यांच्या मालाची योग्य ती काळजी घेऊन वाहतूक करण्याच्या सूचना महामंडळ प्रशासनाने दिल्या आहेत.
शाहू नगरातील रस्त्यांची दुरवस्था
जळगाव : गोविंदा रिक्षा थांब्याकडून शाहू नगरकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात तर वाहनधारकांचे अधिकच हाल होत आहेत. त्यामुळे मनाला प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.