जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे सर्वात स्वच्छ व सुंदर स्टेशन ठेवणाऱ्या रेल्वे स्टेशनला पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी भुसावळ विभागातील सर्वच्या सर्व १०४ लहान-मोठ्या स्टेशनांनी या पुरस्कारासाठी भुसावळ विभागाकडे प्रस्ताव पाठविले आहेत. पुढील महिन्यात या पुरस्कारांची घोषणा होणार असल्याचे भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत देशभरातील विविध आस्थापनांमध्ये स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येत आहे. यासाठी वेळोवेळी स्वच्छता मोहीम राबवून, स्वच्छता पंधरवडाही साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार रेल्वे बोर्डातर्फेही प्रत्येक विभागांना त्यांच्या अखत्यारित रेल्वे स्टेशन सुंदर ठेवण्याचे आदेश वेळोवेळी देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर भुसावळ विभागातर्फे भुसावळ विभागातील स्वच्छ व सुंदर स्टेशन ठेवणाऱ्या स्टेशनांना स्वच्छ व सुंदर स्टेशनचा यंदा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी भुसावळ विभागातील सर्व लहान-मोठ्या स्टेशनांना पुरस्कार पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार भुसावळ विभागातील सर्वच्या सर्व १०४ स्टेशनांनी हा पुरस्कार आपल्यालाच मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविले आहेत.
स्वच्छतेच्या निकषांची पाहणी करण्यासाठी स्वतंत्र समिती..भुसावळ विभागातर्फे या पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर आलेल्या प्रस्तावावर संबंधित स्टेशनची पाहणी करण्यासाठी भुसावळ विभागातर्फे तीन स्वतंत्र अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. ही समिती संबंधित स्टेशनवर खरोखर स्वच्छता आहे का, याची पाहणी करणार आहे. यासाठी संबंधित स्टेशनचा सर्व परिसर, स्वच्छतागृहे, प्रतीक्षालय, तिकीट खिडकी परिसर, दादरा आदी भागांची पाहणी करून निरीक्षण नोंदविणार आहे. यात स्वच्छतेच्या निकषांची जे रेल्वे स्टेशन पूर्तता करत असेल, अशा स्टेशनला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
वर्गवारीनुसार पुरस्काराचे वितरण..भुसावळ विभागातील १०४ स्टेशनांनी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्यानंतर लहान व मोठ्या स्टेशनांची स्वतंत्र वर्गवारी करून प्रथम ते तृतीयपर्यंतच्या स्तरावर पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारामध्ये रोख बक्षीस, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन संबंधित स्टेशनच्या अधिकाऱ्यांना डीआरएम यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे भुसावळ विभागातील स्वच्छ व सुंदर स्टेशनला पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी भुसावळ विभागातील सर्वच्या सर्व १०४ स्टेशनने प्रस्ताव पाठविले असून, लहान-मोठ्या स्टेशनची स्वतंत्र वर्गवारी करून हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. समितीच्या पडताळणी अवहवालानंतर पुढील पुढील महिन्यात या पुरस्कारप्राप्त स्टेशनांची घोषणा केली जाईल.डॉ. शिवराज मानसपुरे,सीनिअर डीसीएम, भुसावळ रेल्वे विभाग