भुसावळ, जि.जळगाव : शहरातील गणेशपुरी जामनेर रोडवरील रहिवाशी पंकज मुरलीधर पाटील (४३) यांच्या चितेला त्यांच्या तिन्ही बहिणींनी साश्रू नयनांनी अग्निडाग दिला. तेव्हा सर्वांना गहिवरून आले होते.पंकज पाटील मोटारसायकलचे मेकॅनिकल म्हणून पुणे येथे काम करीत होते. वडिलांच्या मृत्यूनंतर मॅकेनिकलचे काम अव्याहत सुरू ठेवले. पुणे येथे त्यांचे सर्व व्यवस्थित सुरू असताना तीन दिवसांआधी त्यांची अचानक प्रकृती खालावली. त्यांना पुणे येथेच दवाखान्यात भरती केले. प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना अति दक्षता विभागात दाखल केले. त्यांच्या तिन्ही भगिनी त्यांना भेटण्यासाठी गेल्या. तेव्हा पंकज यांनी भुसावळ येथे जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या इच्छेनुसार त्यांना शनिवारी भुसावळ येथे घेऊन आल्यावर घरी त्यांचे निधन झाले.पंकज यांना मुलगा नसल्याने त्यांना अग्निडाग देणार कोण हा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी समाजातील पारंपरिक प्रथेला फाटा देत तिन्ही बहिणींनी पुढे येत अग्निडाग द्यायचे ठरवले. घरातील सर्व नातेवाईकांनी होकार देताच भुसावळ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी स्मिता, दोन मुली दीपिका व खुशबू असा परिवार आहे.अंत्यसंस्कारावेळी कांचन सुहास इंगळे (ठाणे), रंजना धनराज चौधरी (मनमाड) व अरुणा नीरज जावळे (बडोदा) या तिन्ही बहिणींनी दाखवलेले आपले आद्य कर्तव्य पाहून उपस्थितांना गहिवरून आले.
भुसावळ येथे साश्रू नयनांनी तिघा बहिणींनी दिला भावाला अग्निडाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 6:27 PM