चोपडा, जि.जळगाव : तालुक्यातील हातेडसह अनवर्दे परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. यासाठी या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.हातेडसह अनवर्दे परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. दोन दिवसांपूर्वी शिवारात बिबट्याने वासरूवर हल्ला केला. यात वासरू मृतावस्थेत आढळले. यानंतर दुसऱ्या दिवशी एका युवकावर हल्ला चढविला.यात तरुणाच्या पायाला दुखापत झाली आहे. परंतु तरीही युवकाने प्रतिकार करत बिबट्याला पळवून लावले.या घटनेनंतर पंचक्रोशीसह परिसरात शेतमजूर व ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रब्बी हंगामतील पिकांना पाणी देण्यासाठी भीतीपोटी मजूरदेखील मिळत नाही. परिणामी शेतकरी वर्गाला नुकसानीची झळ सोसावी लागत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष दीपक सोनवणे यांनी वनअधिकारी यांना फोनवरून विचारणा केली. ‘आम्ही पिंजरा व कॅमेरा लावण्यासाठी लवकरच कार्यवाही करतो,’ असे सांगण्यात आले. परंतु याआधीदेखील ग्रामस्थांनी वेळोवेळी मागणी करूनदेखील वनविभागाने याकडे दुर्लक्षच केले आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर आहे. तत्काळ दाखल घेऊन योग्य त्या उपाययोना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.
चोपडा तालुक्यातील अनवर्दे-हातेड परिसरात बिबट्याचा हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2020 12:41 AM
हातेडसह अनवर्दे परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे.
ठळक मुद्देउपाययोजना करातत्काळ कॅमेरा व पिंजरे लावा