कृत्रिम बेट, श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यान सौंदर्यींकरण रखडले : बॉटनिकल गार्डन, बटरफ्लाय पार्क अंमलबजावणी नाहीच
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील काव्यरत्नावली चौक परिसरातील पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या शेजारील मोकळ्या जागेत लोकसहभागातून आकर्षक बेट तयार करण्याची घोषणा तीन वर्षांपूर्वी केली होती. यासह श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानाचे सौंदर्यींकरण, डीमार्ट परिसरातील चौकाचे सुशोभिकरण, मेहरूण तलाव परिसरातील शिवाजी उद्यानात बॉटनिकल गार्डन, बटरफ्लाय पार्कसह अनेक कामांची घोषणा गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात मनपातील विद्यमान व तत्कालीन सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली होती. मात्र, तीन वर्षांत यापैकी कोणतेही काम पूर्ण झालेले नाही. विशेष म्हणजे साधी सुरुवातदेखील झालेली नाही.
मनपातील सत्ताधाऱ्यांकडून अनेक घोषणा केल्या जातात. त्या घोषणा केल्यामुळे संबधित पदाधिकारी चर्चेतदेखील येतात. मात्र, त्यांच्या या मोठ-मोठ्या घोषणा केवळ नावालाच ठरतात. गेल्या तीन वर्षांत शहरात लोकसहभागातून अनेक कामे करण्याचा घोषणा करण्यात आल्या. मात्र, या घोषणा ‘एक वर्षात शहराचा चेहरा-मोहरा’ बदलण्यासारख्याच झाल्या आहेत. महात्मा गांधी, भाऊंचे उद्यान या दोन उद्यानांचे सुशोभिकरण झाले. मात्र, इतर कामांचे काय ? याबाबत आता कोणीही बोलायला तयार नाही.
काव्यरत्नावली चौकातील कृत्रिम बेट, नावालाच
काव्यरत्नावली चौकाच्या बाजूलाच मुख्य रस्त्यालगत पोलीस अधीक्षकांच्या शेजारील असलेल्या जागेचा वापर करून दोन्ही बाजूचा रस्तांचा रुंदी वाढवून रस्त्याच्या मधोमध हे बेट उभारले जाणार होते. तत्कालीन महापौर नितीन लढ्ढा यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. यासाठी जैन उद्योग समूहासोबतदेखील चर्चा झाली होती. जैन कंपनीकडून या काव्यरत्नावली चौकात आयलॅंड करण्याची संकल्पना तसेच डिझाइनदेखील केले होते. मात्र, खाविआची सत्ता गेल्यानंतर या कामासाठी पाठपुरावा थांबला होता. त्यानंतर भाजपचे तत्कालीन स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांनी ही यासाठी पाठपुरावा केला. मात्र, कामाला सुरुवातदेखील झाली नाही.
तांबापुरा चौक सुशोभिकरणाचे तीन वर्षांपासून काम रखडलेलेच
शहरातील डी-मार्टसमोरील तांबापुरा चौकाचेदेखील सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. तत्कालीन महापौर नितीन लढ्ढा यांनीच या कामासाठी पुढाकार घेतला होता. जैन उद्योग समूहाच्या सहकार्यानेच हे काम हाती घेण्यात आले होते. कामाला सुरुवातदेखील झाली होती. मात्र, विद्युत खांब हटविण्याचे काम मनपा प्रशासनाला करावयाचे होते. हे कामदेखील मनपा प्रशासनाकडून झाले नाही. त्यामुळे तांबापुरा चौकाचेही काम आजपर्यंत रखडलेलेच आहे.
बॉटनिकल गार्डनचीही नुसती घोषणाच
मेहरूण तलाव परिसरातील शिवाजी उद्यानातील मनपाच्या सात एकराच्या मालमत्तेवर पर्यटकांच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल असे ‘थीम पार्क’ तयार करण्यात येणार असल्याची घोषणा २०२०-२०२१च्या अर्थसंकल्पात तत्कालीन स्थायी समिती सभापती ॲड. सूचिता हाडा यांनी केली होती. यामध्ये ‘जळगाव जिल्हा दर्शन’ संग्रालयासह ‘बॉटनिकल गार्डन’ व ‘बटरफ्लाय पार्क’चाही समावेश राहणार होता. तर जिल्हा दर्शन संग्रालयात जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणांच्या माहितीसह जिल्ह्यातील महान पुरुषांचाही इतिहासाची माहिती दिली जाणार होती. यासाठी अर्थसंकल्पात पाच कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र, वर्षभरात यासाठी कोणताही पाठपुरावा किंवा कामाचे नियोजनदेखील करण्यात आलेले नाही.
कोट...
गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव होता. त्यामुळे अनेक कामे जी मनात होती ती या कोरोनामुळे करता आली नाहीत. त्यासाठी पाठपुरावा करण्यासह फारसा वेळ या आपत्तीत मिळाला नाही. मात्र, जी कामे होऊ शकतील त्यासाठी नक्कीच पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करु.
-भारती सोनवणे, महापौर