प्रशांत भदाणे
जळगाव जिल्हा दूध संघातील न्यायालयीन वादात आज कोर्टाने संचालकांच्या बाजूने निर्णय दिल्याची माहिती समोर येत आहे, मात्र या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये. जिल्हा दूध संघातील वाद हायकोर्टात पोहचला होता. राज्य सरकारने यावर प्रशासक मंडळ बसवून या मंडळाने कारभार हाती घेतला होता. संचालक मंडळांचे अधिकार काढण्यात आले होते.
तसेच, संचालक मंडळाच्या कालावधीतील व्यवहारातील कथित अनियमिततेवरून राज्य सरकारने चौकशीचे आदेश देखील जारी केले होते. या संदर्भात आज हायकोर्टाने निकाल दिला असून न्यायालयाने संचालक मंडळाचे म्हणणे मान्य करून प्रशासक मंडळ अवैध असल्याचा निकाल दिल्याचे सांगितले जात आहे.
न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे गिरीश महाजन गटाला मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांचे दूध संघावर गेल्या काही वर्षांपासून वर्चस्व आहे. खडसेंना अडचणीत आणण्यासाठी महाजन गटाने खेळी करत दूध संघावर प्रशासक मंडळ नियुक्त केलं होतं, परंतु न्यायालयाच्या निकालामुळे हे प्रशासक मंडळ औटघटकेचं ठरलं आहे.