जळगाव - माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी शिवसेनेतील पदांचा राजीनामा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसैनिकांनी घेतलेल्या या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरूच आहे. आज धरणगाव तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.
राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये उपजिल्हाप्रमुख पी. एम. पाटील, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, युवासेना तालुकाप्रमुख चेतन पाटील, युवासेना विभागप्रमुख नितीन पाटील, विभागप्रमुख संजय चौधरी, शहर संघटक मच्छिंद्र पाटील, उपतालुका प्रमुख मोतीराम पाटील, माजी उपनगराध्यक्षा कल्पना महाजन, नगरसेवक अजय चव्हाण यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
धरणगाव तालुका हा विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात मोडतो. हा मतदारसंघ माजीमंत्री गुलाबराव पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. शिवसेनेच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत, ते सर्व जण गुलाबराव पाटील यांचे समर्थक आहेत. गुलाबराव पाटील शिंदे गटात गेल्याने धरणगावात शिवसेनेला धक्का बसेल असा अंदाज तेव्हाच बांधण्यात आला होता, तो अखेर आज खरा ठरला आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
बंडखोरांची राजकीय आत्महत्या - संजय राऊतशिवसेनेची ताकद आम्हाला माहिती आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात सध्या काय खळबळ माजली आहे हे माहिती आहे. शिवसेना सोडली ते राजकारणातून हद्दपार झाले आहेत. ज्यांनी शिवसेना सोडली ते राजकारणातून हद्दपार झाले. हा इतिहास बदलण्याची ताकद शिंदे गटात नाही. ज्यांना भाजपाचा पुळका होता ते युती असताना पराभूत झाले होते. बंडखोरांनी राजकीय आत्महत्या केली आहे. त्यांचा राजकीय अंत लवकरच होईल अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना फटकारलं आहे.