चाळीसगाव : कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने गेल्या चार दिवसांपासून बंद असलेले लसीकरण शनिवारी पुन्हा सुरू झाले. यामुळे शहरातील पालिकेच्या आणि ग्रामीण रुग्णालयाच्या दोन्ही लसीकरण केंद्रांवर सकाळपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केली असल्याचे दिसून आले.
या वेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे यांनी दोन्ही केंद्रांवर जाऊन आढावा घेतला. लस उपलब्ध नसल्याने मंगळवारपासून लसीकरणाला थांबा मिळाला होता. शुक्रवारी सायंकाळी लसीचे चार हजार डोस मिळाल्याने शनिवारी लसीकरणाला पुन्हा सुरुवात झाली. चार दिवसांनंतर लस उपलब्ध झाल्याने नागरिकांनी लस घेण्यासाठी एकच गर्दी केली होती.
पालिकेच्या रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयास प्रत्येकी ३०० डोस प्राप्त झाले. सकाळीच नागरिकांना टोकन देण्यात आले. ग्रामीण भागातील १० प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसींचे प्रत्येकी ३०० डोस देण्यात आले आहेत.