जळगाव : गेल्या १५ दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले असून यापासून बचावासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मास्कचा वापर न करणे सॅनेटायझेशनमध्ये ढिलाई, यामुळे संसर्ग अधिक वाढत असून हे टाळत सर्वांनी नियमांचे पालन करा, अन्यथा आगामी काळात मोठा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे.
‘पॉझिटिव्हिटी’ १० टक्क्यांपर्यंत पोहचली
कोरोनाचा धोका जिल्ह्यात वाढू लागला असून तीन टक्क्यांवर असलेले बाधितांचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी) आता १० टक्क्यांपर्यंत पोहचले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे प्रशासनाच्यावतीने तयारी करण्यासह आरोग्यविषयक उपाययोजनादेखील केल्या जात असल्याचे सांगितले. रुग्ण वाढल्यास ऑक्सिजन, औषधींचा तुटवडा भासणार नाही, यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
सर्व्हे वाढविणार
कोरोनाचा संसर्ग पाहता आता मोठ्या प्रमाणात सर्व्हे करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. यात गेल्या वर्षाप्रमाणे खाजगी डॉक्टर, लॅब, औषध विक्रेते यांचे सहकार्य घेत त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली जाईल व रुग्ण शोधण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
लग्नसमारंभावर विशेष लक्ष, विनाकारण प्रवास टाळागर्दी होणार नाही, यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. मात्र तरीदेखील या विषयी गांभीर्य नसल्याने गर्दीच्या कार्यक्रमांवर त्यातल्या त्यात लग्नसमारंभांवर विशेष लक्ष राहणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत म्हणाले. ५० जणांच्या उपस्थितीची मर्यादा दिली असून त्याचे पालन करा, सर्व ठिकाणी पथकांची नजर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अनावश्यक प्रवास टाळा, कोठे आवश्यक असेल तर जा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
काय म्हणाले जिल्हाधिकारी
लक्षणे असल्यास तत्काळ तपासणी करा
यंत्रणा सज्ज आहे, आजार लपवू नका
मे-जूनमधील स्थिती पुन्हा येऊ देऊ नका
पॉझिटिव्ह असल्यास आयसोलेशनमध्ये रहा
दंड करण्याचा हेतू नाही, सामाजिक भान ठेवा
दुसऱ्या वेळी कोरोनाला हरवायचे आहे, सहकार्य करा