जामनेर जि. जळगाव : वसंतराव नाईक महामंडळास एक हजार कोटी रुपये देण्याची शासनाने केलेली घोषणा पूर्ण होऊ शकली नाही, इतर समाजास, महामंडळांना शासन निधी देते, मात्र गोरबंजारा समाजावरचा अन्याय का? आरक्षणाबाबतही समाजावर सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप माजी वनमंत्री आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी सोमवारी " लोकमत" शी बोलताना केला. (MLA Sanjay Rathod speaks on reservation of Gorbanjara community.)
राठोड हे सोमवारी जामनेर तालुक्याच्या भेटीवर आले होते. तालुक्यातील गोरबंजारा समाजाच्या तांड्यावर त्यांनी भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी राठोड यांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आम्हाला कुणाच्याही ताटातले नको, आमचे हक्काचे तेव्हढे द्या. व्हीजेएनटीमधील मूळ डाटानुसार आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
आजपर्यंत १० आयोगांची स्थापना झाली, मात्र पदरात काहीच पडले नाही. समाजाची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे. अति मागासलेले असा उल्ल्लेख इंग्रजांनी केला होता. एसटी संवर्गाच्या साडे सात टक्के आरक्षणाला धक्का लागू न देता गोरबंजारा समाजाला एसटी ब संवर्गात समावेश करून आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे, असेही ते म्हणाले.