८ जून रोजीची ओडिशातील एका न्यूज चॅनलची आरोपींचे फोटो असलेली एक व्हिडीओ क्लीप या परिसरातील प्रत्येक मोबाइलमध्ये पोहोचली असून, या प्रकाराची मोठी चर्चा येथे सुरू आहे. हा धंदा गेली अनेक वर्षे सुरू आहे. संबंधितांनी या धंद्यातून मोठी माया जमवली आहे. या धंद्याची सूत्रे परिसरातील अनेक खेडेगावात तर आहेतचस पण धुळे व नासिक येथील अनेक मोठी धेंडेदेखील यात सहभागी असल्याची जोरदार चर्चा आहे.
गांजा खरेदीसाठी रोख रक्कम लागत नाही. खरेदी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा मुलगा, भाऊ किंवा जवळचा नातेवाईक खरेदीदाराकडे सेक्युरिटी म्हणून ठेवण्यात येतो. पैसे दिल्यावर हा नातेवाईक घरी येतो. एकाच वेळी दहा-बारा क्विंटलपासून जशी विक्रीची लाइन असेल, तसा जास्त मालदेखील उचलला जातो. रस्त्यात माल पकडला जाणार नाही, याची मोठी खबरदारी घेण्यात येते व मोठी रोख रक्कम सोबत बाळगली जाते. पैसे मोजल्यावर कुणी ही गाडी अडवत नाही, अशी चर्चा आहे.
अजामीनपात्र गुन्हा
हा माल पकडल्यावर या गुन्ह्यात जामीन मिळत नाही. गुन्हा सिद्ध झाल्यास किमान दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे, अशी माहिती कायद्याचे जाणकार ॲड. भोसले यांनी दिली आहे. कडक शिक्षेची तरतूद असल्याने माल पकडल्यावर कितीही पैसे मोजून गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी या टोळीचा प्रयत्न असतो. एकाच तडजोडीत लाखो रुपये मोजून देण्याचीदेखील या टोळीची क्षमता असते, असेदेखील या टोळीच्या खास मित्रांकडून होत असलेल्या चर्चेतून माहिती मिळत आहे.
या परिसरापासून ओडिशा किमान हजार ते पंधराशे कि.मी. आहे. दोन-तीन राज्यांच्या सीमा लागतात. तरी हा अवैध माल किती बिनबोभाट येतो व जातो. यामुळे आपल्या सुरक्षा व तपास यंत्रणा किती जोरदारपणे कार्यान्वित आहेत, अशीदेखील चर्चा होत आहे.
ओडिशा राज्यातील पोलीस अधिक तपासासाठी आमच्याकडे येतीलच. पण अजून आलेले नाहीत. याबाबत भरपूर चर्चा असल्याने आम्ही अनेकदा या परिसरात झाडाझडती घेतली आहे, पण येथे काहीही मिळून आलेले नाही. पण आता या आरोपींकडून अधिक माहिती मिळू शकते, असे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांनी सांगितले आहे.