अमळनेर, जि. जळगाव : देशाचे मूळ कापणे म्हणजे देशद्रोह असून सीएए व एनआरसी कायदा आणून सरकार देशाच्या एकात्मतेत फूट पाडण्याचे काम करीत आहे. सरकारच हा देशद्रोह करीत आहे, अशी टीका राजकीय विचारवंत, कृषी चळवळीचे मार्गदशक योगेंद्र यादव यांनी अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे आयोजित ‘भारत संविधान लोकशाही’ विषयावर लोकशाही बचाव समितीतर्फे आयोजित सभेत केली. नेते जे टीव्हीवर बोलतात ते कायद्यात लिहित नाहीत. नागरिक्तव कायदा तुम्हाला सांगितला तर लाखो लोकांपर्यंत हा संदेश जाईल, असेही ते म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की मी कपड्यावरून माणूस ओळखतो पण त्यांना तिरंगा दिसत नाही. त्यांना तिरंग्याचा अभिमान नाही याचा खेद वाटतो. ज्यांना स्वातंत्र्य माहीत नाही त्यांना स्वातंत्र्य आंदोलनाचे महत्व कळणार नाही.सीएए कायदा नागरिकांत दुफळी निर्माण करणारा असल्याचे सांगत ते म्हणाले की, एनआरसी व एनपीआर म्हणजे काही माहिती सांगू न शकल्यास किंवा चुकल्यास नागरिकांवर संशयाचा ठपका लावण्यात येईल, अशी भीती व्यक्त केली. त्यानंतर तुम्हाला नोटीस देऊन तुमच्याकडे भारतीय असल्याचा पुरावा मागितला जाईल, जन्माचा पुरावा मागितला जाईल. आज अनेक लोक आणू शकत नाहीत आणि अशा लोकांना विदेशी न्यायालयात पाठवण्यात येईल, असेही ते म्हणाले.मी संतांच्या भूमीत आहे, सानेगुरुजींच्या कर्मभूमीत आहे. हिंदी माझी आई तर मराठी माझी मावशी आहे. मावशीच्या गावात आईची भाषा बोलण्याची परवानगी घेतो असे म्हणत यादव यांनी भाषणाला त्यांनी सुरुवात केली होतीयावेळी प्रतिभा शिंदे, आमदार अनिल पाटील, करीम सालार यांचेही भाषणे झाली.
देशाच्या एकात्मतेत फूट पाडणे हाच मोठा देशद्रोह - योगेंद्र यादव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 12:58 PM