जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या ब्रेक द चेन दरम्यान विविध साहित्याची दुकाने बंद असल्याने त्याचा बांधकामावर देखील परिणाम होत आहे. मात्र कोरोनाच्या संकटकाळात सहकार्य म्हणून बांधकाम व्यवसायिकांनी देखील नियोजन करून जे साहित्य थेट कंपनीतून मिळत आहे ती कामे सुरु ठेवली असून निर्बंध शिथिल झाल्यानंतर इतर कामे करण्याचे ठरविले आहे.
गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे सर्वच क्षेत्राला त्याची झळ सहन करीत आहे. त्यात ५ एप्रिल पासून ब्रेक द चैन लागू करून अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे. यामध्ये बांधकामे सुरू ठेवण्यास परवानगी आहे, मात्र बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने बंद असल्याने त्याचा परिणाम बांधकाम क्षेत्रावर जाणवत आहे. यामध्ये गेल्या वर्षाप्रमाणे हा व्यवसाय पूर्ण ठप्प होऊ नये म्हणून बांधकाम व्यवसायिकांनी नियोजन करीत कामेही सुरू राहावे व प्रशासनाला देखील सहकार्य व्हावे या दृष्टीने नियोजन केले आहे.
थेट कंपनीतून देणाऱ्या साहित्याचा वापर करून कामे सुरू
बांधकामाशी निगडित असलेल्या साहित्याची दुकाने बंद असली तरी कंपन्या, कारखाने यांना उत्पादनाची परवानगी आहे. यामध्ये सिमेंट, स्टील, टाइल्स, खडी, वाळूचे साहित्य थेट कंपनीतून मागविता येत असल्याने बांधकामे सुरू ठेवली आहे. या साहित्याचा ज्या-ज्या ठिकाणी उपयोग होतो ती कामे करण्याचे नियोजन बांधकाम व्यवसायिकांनी केले आहे.
इतर कामे शिथिलता मिळाल्यानंतर
कंपनीतून येणाऱ्या साहित्यातून होणारे कामे सध्या करून त्यानंतर छोटी कामे केली जाणार आहे. त्यामध्ये दुकाने बंद असल्याने दरवाजे, खिडक्या, काच, स्क्रू, खिळे, प्लास्टरसाठी लागणारे साहित्य उपलब्ध होत नाही. त्यामुळे ही कामे शिथिलता मिळाल्यानंतर करण्याचे नियोजन बांधकाम व्यावसायिकांनी केले आहे.
आरोग्य सांभाळण्यास सह रोजगारही टिकावा
कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने सरकार व प्रशासनाच्यावतीने उपाययोजना केल्या जात आहे. त्याला सहकार्य आवश्यक असल्याने छोट्या-छोट्या गोष्टींसाठी मागणी न करता स्वतः नियोजन करीत उपाययोजना करणेच योग्य असल्याचे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता जे उपलब्ध आहे ती कामे करावी व त्यातून बांधकाम क्षेत्रात असलेल्या मजुरांच्या हाताला काम मिळावे व त्यांचा उदरनिर्वाह सुरळीत सुरू राहावा, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही सांगण्यात आले.
छोट्या बांधकामांना अडचणी
जे मोठे बांधकाम आहे त्या ठिकाणी थेट कंपनीतून माल मागविला जातो. मात्र ज्या ठिकाणी छोटे-छोटे कामे सुरू आहे तेथे टाइल्स, सिमेंट व इतर वस्तू मिळण्यास अडचणी येत आहे. पूर्ण गाडीभर टाइल्स मागवली तर ती कंपनीतून उपलब्ध होते मात्र छोट्या कामांसाठी टाइल्स पेटी स्वरूपात घेतल्या तर त्या मिळत नसल्याने छोट्या बांधकामाच्या ठिकाणी अडचणी येत आहे. सिमेंटच्या बाबतीतही अशीच स्थिती आहे. त्यामुळे या छोट्या बांधकामाच्या ठिकाणी जे साहित्य उपलब्ध आहे तेवढी कामे केली जात आहे.
--------------------
थेट कंपनीमधून उपलब्ध होणाऱ्या साहित्याची कामे करणे शक्य आहे ती केली जात असून दुकानांवरुन आणाव्या लागणाऱ्या साहित्याची कामे सध्या थांबली आहे. त्यादृष्टीने बांधकामाचे नियोजन देखील केले असून कोरोनाच्या संकटात बांधकाम व्यावसायिकांनी सहकार्य करण्याचे ठरविले आहे. मजुरांचाही रोजगारही सुरू राहावा म्हणून मोठी कामे सुरूच आहे.
- अनिश शहा, राज्य सहसचिव क्रेडाई