लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) या पतसंस्थेमध्ये अवसायक जितेंद्र कंडारे यानेच इतरांशी संगनमत करुन ठेवीदारांची फसवणूक केल्याचा गुन्हा पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पुणे शहर पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेच्या तब्बल १३५ जणांच्या पथकाने २९ नोव्हेंबर रोजी एकाचवेळी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी छापे घातले. सुमारे तीन ट्रक कागदपत्रे जप्त केली. अत्यंत गोपनीय आणि सुनियोजितपणे केलेल्या या कारवाईचे प्रमुख नेतृत्व पोलीस दलातील ४ महिला अधिकाऱ्यांनी केले होते.
जळगावात अपर पोलीस अधीक्षक राहिलेल्या व सध्या पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, पिंपरीच्या सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक आणि बीएचआरच्या प्रमुख तपास अधिकारी सुचेता खोकले यांनी या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व केले. याशिवाय पोलीस निरीक्षक स्वाती देसाई, संगीता यादव, अनिता मोरे, सहायक पोलीस निरीक्षक अर्चना बोदडे यांच्याकडेही जबाबदारी सोपविण्यात आली होती.
जळगाव शहर व परिसरात कुठे छापे मारायचे. त्यासाठी कोणत्या ठिकाणी किती जणांची गरज लागेल. इथंपासून पुण्यातून जळगावात जायचे कसे, कारवाईसाठी आलेल्यांच्या चहा, नास्ता, जेवणापर्यंतची सोय कशी करायची याचे संपूर्ण नियोजन पुण्यातून निघतानाच केले होते. सुमारे १२ वेगवेगळी पथके तयार होती. त्यातील प्रमुख ४ ते ५ जणांना याची माहिती होती. त्याशिवाय बाकी कोणालाही या कारवाईची फारशी माहिती नव्हती.
जळगावच्या मोजक्याच अधिकाऱ्यांची घेतली मदत
पुण्यातून निघून या पथकांनी सकाळी एकाचवेळी जळगाव त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी छापे घालण्यास सुरुवात केली. सलग तीन दिवस ही कारवाई सुरु होती. अवसायकानेच इतका मोठा अपहार करण्याचीही पहिलीच घटना आहे. नवटके या पुण्यात बदलून जाण्याआधी जळगावातच अपर पोलीस अधीक्षक असल्याने त्यांना शहराची बऱ्यापैकी माहिती होती, त्याशिवाय विश्वासपात्र अधिकारी कोण? याचीही त्यांना कल्पना होती. त्यानुसार काही मोजक्या अधिकार्यांची त्यांनी मदत घेतली.
सरकारी वकिल म्हणून प्रवीण चव्हाण
बीएचआरच्या पुण्यातील गुन्ह्यात सरकारी वकील म्हणून प्रवीण चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. तर जळगावात सुरु असलेल्या खटल्यात जिल्हा सरकारी वकील केतन ढाके काम पाहत आहेत. जळगाव न्यायालयातच सर्व खटल्यांचे कामकाज चालणार आहे.
कट्टेंची कोल्हापुरातही धाडसी कारवाई
प्रेरणा कट्टे याअगोदर कोल्हापूर शहरात कार्यरत होत्या. त्या ठिकाणीही त्यांनी अशीच एक मोठी धाडसी कारवाई केली होती. सुमारे दीड वर्षापूर्वी कोल्हापूरमध्ये मुंबई मटका वर त्यांनी एकाचवेळी काही ठिकाणी छापे घालते होते. त्यात ४४ जणांना अटक करण्यात आली आहे. हे आरोपी अजूनही तुरुंगात आहेत.
कोट..
या कारवाई दोन पोलीस उपायुक्त, ४ सहायक पोलीस आयुक्त, २५ पोलीस निरीक्षक, २५ सहायक पोलीस निरीक्षक आणि १०० कर्मचारी असा मोठा फौजफाटा होता. सर्वांनी योग्य तो समन्वय राखून ही कारवाई यशस्वी केली. आर्थिक गुन्हे शाखेत महिला अधिकाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने कारवाई त्यांचा सहभागही महत्वाचा ठरला
-भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा.
कोट...
या कारवाईसाठी आमच्या वेगवेगळी पथके करण्यात आली होती. त्यात त्यांना शेवटपर्यंत आपण कोठे कारवाईसाठी जात आहोत, याची कोणालाही माहिती नव्हती. केवळ काही मोजक्या प्रमुख अधिकाऱ्यांना काय कारवाई करायची कोणी कोठे छापे मारायचे, याची माहिती होती. त्यामुळेच ही कारवाई अत्यंत यशस्वी झाली असे वाटते.
- प्रेरणा कट्टे, सहायक पोलीस आयुक्त,