कजगाव, ता. भडगाव : गेल्या महिन्यात दि. ११ ला सुरू झालेले चोरीचे सत्र थांबता थांबेना. दि. ११ मे ते १० जूनदरम्यान घरफोड्या, रस्ता लूट, गुरे चोरी, मोटारसायकल चोऱ्या अशा चोरीच्या घटना एकामागून एक घडत असल्याने नागरिकांत व वाहनधारकांत घबराट पसरली आहे. दि. ९च्या मध्यरात्रीनंतर येथील रेल्वे कर्मचारी यांची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लांबवत चोरीचे सत्र कायम ठेवले आहे.
दि. ११ मे रोजी अमावास्येच्या रात्री एकाच रात्रीत तीन घरे फोडत अज्ञात चोरट्यांनी चोऱ्याचा शुभारंभ केला, तो एक महिन्यानंतर देखील कायम आहे. चोरांनी पोलिसांना आव्हान देत एका मागून एक चोरीचा सपाटा कायम ठेवला आहे. चोर सुसाट झाले आहेत, तर पोलीस तपास करत आहेत. मात्र, अद्याप एकाही चोरीचा तपास लावण्यात यश आले नसल्याने चोरट्याची हिंमत वाढत आहे.
दि. ९च्या मध्यरात्रीनंतर येथील रेल्वे कर्मचारी प्रशांत पाटील यांची मोटारसायकल (एमएच-१९ सीएस-९६८२) ही स्टेशन भागातील रेल्वे क्वाॅर्टरमधून शेडमध्ये लॉक करून लावलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी लांबवली. एकामागून एक चोऱ्या होत असल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे.
कजगावात चोरीची मालिका दि. ११ मे रोजी सुरू झाली. शुभारंभ एकाच रात्रीत तीन घरे फोडत करण्यात आला. या नंतर काही तासांतच दि. १३ रोजी दिवसाढवळ्या रस्ता लूट, यानंतर दि. २ रोजी एक मोटारसायकल रात्री तर एक मोटारसायकल दिवसाढवळ्या गजबजलेल्या रेल्वे गेटपासून लांबवली. दि. ३ रोजी कजगावपासून एक किलोमीटरवर असलेल्या भोरटेक येथून मुख्य रस्त्यावर असलेल्या बंद शेडमधून चार गायी चोरल्या. दि. ८ च्या मध्यरात्रीनंतर पाच पावली मातानगरमधून मोटारसायकल लांबवली. पुन्हा एकाच दिवसाच्या ब्रेकनंतर रेल्वे क्वॉर्टरमधून मोटारसायकल लांबवत चोरीचा महिन्याचा वर्तुळ पूर्ण केला. अज्ञात चोरट्यांनी दि. ११ मे रोजी अमावास्येच्या रात्री चोरीची बहोनी केली होती.
पेट्रोल संपले नि मोटारसायकल सोडली
कजगावची एक मोटारसायकल बाळदला पेट्रोल संपल्यामुळे चोरट्यांनी सोडली. तेथून दुसरी मोटारसायकल लांबवली, ती फिरवून पेट्रोल संपल्यामुळे कजगाव येथे वाडे रस्त्यावर बेवारस सोडलेली मिळाली. या पद्धतीने मोटारसायकल लाबविल्या जात आहेत. ते चोरणारे रॅकेट या भागात सक्रिय झाले आहेत, याचा पोलिसांनी कसून शोध घेणे गरजेचे आहे.
तपास लागेना, चोर सुसाट
गेल्या महिनाभरापासून अज्ञात चोरट्यांनी कहर केला आहे. ‘ब्रेक के बाद’ पद्धतीने चोऱ्याचा धुमाकूळ सुरू झाला आहे. मात्र, पोलिसांना तपास लावण्यात अद्याप यश आलेले नाही. चोरट्यांच्या धुमाकूळमुळे मात्र ग्रामस्थ व वाहनधारकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.