ऑनलाईन लोकमत
चोपडा/ मुंगसे,दि.30 - सूर्यकन्या तापी नदीचा जन्मोत्सव सोहळा नीमगव्हाण (ता.चोपडा) येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. तापी नदीची विधीवत पूजा करुन नदीची ओटी भरण्यात आली.
नीमगव्हाण येथे स्वामी भक्तानंद गुरू रेवानंद परमहंस श्रीधुनीवाले दादाजी प्रतिष्ठानद्वारा सूर्यकन्या तापीचा जन्मोत्सव सोहळा आणि जलपूजनाचा कार्यक्रम मोठय़ा उत्साहात पार पडला.
1948 पासून धुनीवाले दादाजी प्रतिष्ठानतर्फे तापीमाई जन्मकथा व अखंड नामस्मरण सोहळा आयोजित केला जातो. या सोहळ्यासाठी जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यासह मध्यप्रदेश, गुजरातचेही भाविक दाखल झाले होते.
शुक्रवारी सकाळी सहा ते साडेअकरा दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सकाळी सहा वाजता तापीमाई पोथी समाप्ती झाली. सात वाजता पूजा हवन, समाधी अभिषेक, कळस पूजन करण्यात आल. 9:30 वाजता दादाजी दरबारातून तापीमाई दिंडी सोहळा प्रारंभ झाला. यात कलशधारी महिला , त्यानंतर टाळ मृदुंग, वीणा व भगवे ध्वज निशाण खांद्यावर धरून मोठय़ा भक्तिभावाने निघाले. वनविभागाच्या नाक्यावरून निमगव्हाण चौफुलीवरून जुना तापी नदी रस्त्यावरून भाविकांचा जत्था तापी नदी पत्रात उतरला .
11 वाजेपासून नदी पात्रात प्रारंभी पूजा करून कलशात आणलेल्या पाण्याचा अभिषेक केला. त्यानंतर साडी चोळीची विधिवत पूजा करण्यात आली. श्रीफळ अर्पण करून 11:30 वाजता तापीमाईला साडी व चोळीचा अहेर अर्पण करण्यात आला.
आधी मनाची साडी चोळी स्वामी भक्तानंद गुरू रेवानंद परमहंस श्री दादाजी धुनिवाले प्रतिष्ठान यांच्या तर्फे अर्पण करण्यात आली. नंतर अनेक भाविकांनी स्वतंत्रपणे साडी चोळीचा अहेर चढविला. सुर्यकन्या तापाची आरती झाल्यावर महाप्रसादाचा नैवद्य दिला. यात्रेत चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक केवलसिंग पावरा, फौजदार भगवान पाटील, हवालदार उमेश धनगर, संदीप धनगर यांनी बंदोबस्त ठेवला.