जळगाव : सध्याच्या युगात मुलगा-मुलगी यामधील भेद कमी झाला असला तरी, मुलगी जन्माला आल्यावर अनेकांच्या कपाळावर आठ्या पडतात. पहिली मुलगी असताना आता वंशाला दिवा हवा, असा हट्ट असतो. त्यात दुसरीही मुलगीच झाल्यावर घरातील वातावरण गंभीर होऊन जाते. मात्र, जळगाव शहरातील पाटील कुटुंबीय याला अपवाद ठरले. दुसरी कन्या जन्माला आल्यानंतर या माता-पित्यांनी वाजता-गाजत रूग्णालयापासून ते घरापर्यंत कारमध्ये मिरवणूक काढून कन्या जन्माचे स्वागत केले. विशेष म्हणजे वाहक गणेश पाटील यांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव आगारात काम करणारे गणेश पाटील हे आपल्या परिवारासह शहरातील निमखेडी शिवारात राहतात. पाटील यांना स्वरा नावाची पहिली मुलगी आहे. त्यांना नुकत्याच झालेल्या शिवजयंतीला दुसरे अपत्यदेखील मुलगीच झाली. दुसरे अपत्यही मुलगीच झाल्याने संपूर्ण पाटील कुटुंबीयांना आनंदच झाला. आपल्या या लाडक्या लेकीची शहरातील एका खासगी रूग्णालयातून सुटी झाल्यानंतर पती-पत्नीने या दुसऱ्या लेकीला वाजत-गाजत घरी नेऊन स्वागत करण्याचे ठरविले. त्यानुसार नव्या लेकीला व पत्नीला कारमध्ये बसवुन, तुतारीच्या निनादात घरी आणले. लेकीच्या स्वागतासाठी पाटील यांच्या घरी फुगे आणि फुलांच्या माळांची सजावट करण्यात आली होती.
लेकीचे आगमन होताच, तिचे व आईचे औक्षण करण्यात आले. विशेष म्हणजे घरात प्रवेश करण्यापूर्वी आईने नव्या लेकीच्या पायांचा दरवाजावर स्पर्श करुन, नंतर घरात प्रवेश केला. यावेळी घरातील सदस्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता तर पाटील यांनी लेकीच्या जन्माचे अनोख्या पद्धतीने केलेल्या स्वागताचे सर्वत्र कौतुक होत होते.
इन्फो :
रस्त्याने प्रत्येक घरी वाटली जिलेबी
गणेश पाटील व त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य लेकीला घेण्यासाठी रूग्णालयात गेले होते. यावेळी रूग्णालयातून येतांना त्यांनी रस्त्यात प्रत्येक घरी मुलीच्या जन्माच्या आनंदाची जिलेबी वाटली. दरम्यान, पाटील यांनी मुलगीही मुलाप्रमाणेच श्रेष्ठ आहे. या मुलींना आम्ही मुलाप्रमाणेच समजतो, मुलगी झाल्याचा आमचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे गणेश पाटील यांनी `लोकमत`शी बोलताना सांगितले.