- स्टार : ७२०
मृत्यू वाढताय : आरोग्य यंत्रणेचे कोरोनावरच लक्ष, नॉन कोविड दुर्लक्षित
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना महामारीच्या काळात गेल्या दोन वर्षांत जन्मदरात घट झाली असून, जन्मदर एक ते दीड हजाराने कमी झाला आहे. एकीकडे मृत्यू दर वाढत असताना दुसरीकडे जन्मदर घटल्याची परिस्थिती आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत केवळ डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंतच्या काळात नॉन कोविड सुविधा सुरू करण्यात आल्या होत्या, यामुळे ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील प्रसूतीवर परिणाम झाला आहे.
कोरोना काळात दुसरी लाट आल्यानंतर पुन्हा एकदा निर्बंध कडक करण्यात आले आहेत. यात विवाहावर बंधने घालण्यात आली असून, मोठ्या सोहळ्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. केवळ घरगुती विवाह सोहळा शिवाय नोंदणीकृत विवाहांना परवानगी आहे. यातही केवळ वीस जणांच्या उपस्थितीला परवानगी आहे. त्यामुळे विवाह सोहळ्यांवर परिणाम झाला. अनेकांची लग्न पुढे ढकलण्यात आली आहेत. गेल्या दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यात आले होते; मात्र पुन्हा एकदा निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम सामान्य जनजीवनावर झाला आहे. यासह कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विविध खासगी रुग्णालयांमध्ये कोविडची सुविधा सुरू करण्यात आल्याने शिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पुन्हा एकदा पूर्णतः कोविड करण्यात आल्याने या ठिकाणी सामान्य महिलांच्या प्रसूती होत नसल्याने या ठिकाणची संख्या २०१९ च्या तुलनेत घटली आहे.
जीएमसीत १२०० प्रसूती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २०२१ च्या चार महिन्यांच्या कार्यकाळात १२२९ महिलांच्या प्रसूती झालेल्या आहेत. यात ८० बाधित महिलांचा समावेश आहे. दुसऱ्या लाटेत हे प्रमाण वाढले होते. महिनाभरातच ६० महिलांच्या प्रसूती या ठिकाणी झाल्या. सुरुवातीला गर्भवती बाधितांचे प्रमाण कमी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. एकत्रित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ही प्रसूतीचे प्रमाण घटले आहे.
अशी आहे स्थिती
२०१९ - २०२० जन्म: ७२१०६
२०२०- २०२१ जन्म : ७१२२१
२०२० मृत्यू : १३२९
२०२१ मृत्यू : ११०९ (५ महिन्यांची आकडेवारी)
२०२१ एप्रिलपर्यंत विवाह नोंदणी १४७
जानेवारीपासून १४७ नोंदणीकृत विवाह
यंदा जानेवारी २०२१ पासून आतापर्यंत १४७ विवाह हे नोंदणी पद्धतीने करण्यात आले आहेत. तसेच २५० जोडप्यांनी विवाहाची एक महिना आधी दिली जाणारी नोटीस दिली आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ही संख्या घटली आहे.