गोपाळ व्यासबोदवड, जि.जळगाव : जीवन हे मिथ्या आहे व मृत्यू हे एक सत्य आहे. जो जन्मला आला त्याचा मृत्यू अटळ आहे. म्हणतात ना की मुलगा हा नालायक जरी असला तर शेवटी तोच स्मशानात पोहचवतो. त्याला आज अपवाद ठरला. भाऊ नसल्याने मुलींनीच आपल्या जन्मदात्यास खांदा देत, अंत्ययात्रा काढून अंत्यसंस्कारही केले.शहरातील रेणुका नगरात राहणारे पंजाबराव मुंढे यांचे (वय ६५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना मुलगा नसून, चारही मुलीच आहेत. अंत्यविधी व अंत्यसंस्काराचा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा त्यांच्या चारही मुली हजर झाल्या व वडिलांचा खांदा देऊन अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला त्यांचे पती व सासरकडील मंडळींनी पाठीवर हात ठेवत धीर दिला व डोळ्यातील अश्रुधारा रोखत मोठी मुलगी मनीषा, सोबत मीनल, सोनल, पल्लवी ह्या चारही विवाहिता मुलींनी वडिलांना खांदा देत शहरातील मध्यवर्ती वैकुंठधाम गाठले. एकीने तिरडी धरली तर दुसरीने पाणी दिले, तर चौघांनी मिळून वडिलांना अग्निडाग दिला व शेवटचे पाणीही दिले तसेच अंत्यसंस्काराच्या सर्व क्रिया पार पाडत या भागात नवीन आदर्श घालून दिला.अशी ही घटना बोदवड तालुक्यात प्रथमच घडल्याने शहरवासीयाचे दृश्य पाहत डोळेही पाणावले तर मुलगाच पितरांना पाणी पाजू शकतो या म्हणीला फाटा दिला तर मुलगीही पाणी पाजू शकते व शास्त्रामधील गरूड पुराणाच्या अध्याय अकरा व बारामध्येही याचे वर्णन आहे. जर मुलगा नसला तर मृत व्यक्तीची पत्नी तसेच पत्नी नसल्यास मुलीही अंत्यसंस्कार करू शकतात.हा विषय कुतूहलाचा ठरला.त्याच्या पश्चात पत्नी, चार मुली, नातवंडे असा परिवार आहे.
बोदवड येथे मुलींनी दिला जन्मदात्यास खांदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 4:48 PM