जळगाव : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यातच संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम लांबत असून डिसेंबर महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झाला तरी अद्याप बुथ व मंडळ अधिकारी यांचीच निवड पूर्ण झालेली नाही. त्यामुळे १० डिसेंबरपर्यंत होणारी जिल्हाध्यक्ष निवडही लांबणीवर पडली असून आता ३० डिसेंबर अथवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नवीन जिल्हाध्यक्ष निवड होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, तालुकाध्यक्ष निवडीच्या तारखा ठरविण्यासंदर्भात १८ रोजी जळगाव येथे बैठक होणार आहे.जळगाव जिल्हा हा सुरुवातीपासूनच भाजपचा बालेकिल्ला असून सध्यादेखील दोन्ही खासदार, चार आमदार भाजपचे आहेत. तसेच जि.प., जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून या मोठ्या पक्षाचे जिल्हाध्यक्षपद प्रभारी आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हाध्यक्षांसह जळगाव जिल्हाध्यक्षांचीही निवड प्रक्रिया सुरू होऊन नवीन जिल्हाध्यक्षांची १० डिसेंबरपर्यंत निवड करण्याचे निश्चित करण्यात आले होते. तत्पूर्वी स्थानिक समित्यांचे गठन करणे आवश्यक होते. मात्र राज्यातील राजकीय स्थितीमुळे व जिल्ह्यातील काही घटनांमुळे भाजपची निवड प्रक्रिया लांबल्याचे सांगण्यात आले.प्रदेशाध्यक्षांच्या आढाव्यानंतरही निवड नाहीवेगवेगळ््या कारणांनी भाजपची संघटनात्मक निवड प्रक्रिया लांबत गेल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ७ डिसेंबर रोजी जळगावात उत्तर महाराष्ट्रस्तरीय बैठक झाली. त्यात प्रदेशाध्यक्षांनी सर्व आढावा घेतला व ही प्रक्रिया पूर्ण होऊन प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होईल, असे सांगितले होते. मात्र स्थानिक पातळीवरच निवड प्रक्रिया लांबत असल्याने पुढील निवड कधी होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.नवीन जिल्हाध्यक्ष नवीन वर्षात१० डिसेंबरपर्यंत सर्वत्र नवीन जिल्हाध्यक्ष निवड पूर्ण करण्याचे पक्षाचे नियोजन होते. मात्र आता नवीन जिल्हाध्यक्ष नवीन वर्षातच मिळतील असे चिन्हे आहेत. कारण आतापर्यंत ७० टक्के बुथ प्रमुखांची निवड झाली असून अद्याप मंडळ अध्यक्षांची निवड होणे बाकी आहे. त्यामुळे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मंडळ अध्यक्षांची निवड होऊन त्यानंतर जिल्हाध्यक्षांची निवड होणार आहे.आज बैठकभाजप तालुकाध्यक्ष निवडीसंदर्भात तालुकानिहाय कार्यक्रम निश्चित करण्यासाठी १८ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता जळगाव येथे भाजप जिल्हा कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीला जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर, संघटन महामंत्री पोपट भोळे, संघटन सरचिटणीस सुनील नेवे यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
भाजप जिल्हाध्यक्ष निवडीला नूतन वर्ष उजाडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 12:02 PM