चंद्रशेखर जोशीजळगाव : दिवाळीचा फराळ आटोपला. गट-तट विसरून एकमेकांना शुभेच्छा देणेही पूर्ण झाले. दिवाळीचे फटका आटापले. आता राजकीय फटाक्यांकडे सर्वांचे लक्ष लागून असतानच दिवाळीच्या अगदी दुसऱ्या दिवशी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे जिल्हा दौºयावर आले आहेत. तसे पाहीले तर निवडणुकीचे रणशिंगे कॉँग्रेसने फुंगले. या पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसºया टप्प्याला जळगाव जिल्ह्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या फैजपूरातून प्रारंभ झाला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या संघर्ष यात्रेला सुरूवात झाली. जिल्ह्यातील प्रमुख तालुक्यांमध्ये अशोक चव्हाण यांच्या सभा झाल्या. तसेच जळगाव शहरातील उच्चभ्रू वर्गाशी त्यांनी बैठकीच्या माध्यमातून संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली. कॉँग्रेसच्या या उपक्रमास मोठा प्रतिसादही त्यावेळी मिळाला. खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात ही जनसंघर्ष यात्रा गेली. त्यांच्या पाठोपाठ राष्टÑवादी कॉँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या तब्बल तीन दिवस जिल्ह्यात तळ ठोकून होत्या. त्यांनी युवा वर्गावर लक्ष केंद्रीत केले. दोन्ही लोकसभा मतदार संघात त्यांनी थेट महाविद्यालयीन युवक-युवतींशी संवाद साधला. तसेच समाजातील उच्चभ्रू व्यक्ती, प्रलंबित कामांची ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या. महिला वर्गाशीही त्यांच्या समस्यांवर चर्चा करून राज्य व केंद्रातील सरकारवर टीका करत महागाईने,नोटबंदी यांसह विविध मुद्दे जनतेसमोर मांडले. राष्टÑवादीनेही दोन्ही लोकसभा मतदार संघात आपली बाजू भक्कम करण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला. आता सत्तेतील भाजपाची पाळी आहे. दिवाळी आयोपताच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे हे जिल्हा दौºयावर आहे. रावेर लोकसभा मतदार संघात त्यांनी भुसावळ येथे बैठक घेतली तर दुपारी जळगाव येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजपातील गटबाजीचे अनेक किस्से गत काळात चर्चेत आले. तीच स्थिती यावेळीही होती. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे जिल्ह्यात येणार हे माहिती असताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भुसावळातील बैठकीस दांडी मारली. त्यांची ही अनुपस्थिती राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला आहे. याचे कारण त्यांचे व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यातील वैर. जिल्हा भाजपात खडसे-महाजन गटात अनेक वेळा वाद झाले. दोघा नेत्यांनी एकमेकांना बैठकांमधून चिमटे घेतले. मात्र आता निवडणुका जवळ असताना तिच परिस्थिती दिसून आली. महाजन यांचा विधानसभा मतदार संघ हा रावेर लोकसभा मतदार संघात येतो.असे असताना महाजन यांनी बैठकीकडे पाठ फिरवली आहे. खडसेंच्या स्रुषा रक्षा खडसे या लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन महाजन यांनी दांडी मारल्याचे कार्यकर्त्यांमध्ये चर्चिले जात होते. दोघा नेत्यांमधील संघर्ष आगामी काळात कोणते वळण घेतो. निवडणुकांवर त्याचे काय परिणाम होणार अशा चर्चा यामुळे आतापासून सुरू झाल्या आहेत.
भाजपात गटबाजी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 1:00 PM