जळगाव : भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी गांजा विक्रीप्रकरणी दाखल गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी ड्रग्ज माफियाकडून १० लाखांचा प्रोटेक्शन मनी घेतल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. राज्यात सट्टा, पत्ता, मटका, वाळू चोरी यासह अवैध धंदे चालविण्यासाठी भाजपा सरकारचा आशिर्वाद असल्याचा आरोप नबाब मलिक यांनी केला. अमळनेर येथे काही दिवसांपूर्वी पोलिसांनी११६ किलो गांजा जप्त केला होता. या केसमध्ये ड्रग्ज् माफिया राजू कंजर याचे नाव कमी करण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी त्याच्याकडून दहा लाखांची रक्कम घेतली. मात्र त्यानंतरही गुन्ह्यातून नाव कमी न झाल्याने पैसे परत मागण्यासाठी कंजरने तगादा लावला. त्यामुळे वाघ यांनी पाच लाखांची रक्कम परत केली. उर्वरित पैशांची मागणी केल्यानंतर वाघ यांनी अवैध धंद्यांना संरक्षण देण्यासाठी रक्कम घेतल्याचे सांगितल्याचा आरोपत्यांनी केला.>...तर न्यायालयात खटला दाखल करणारभाजपा जिल्हाध्यक्षांकडून अवैध धंद्यांना संरक्षण देण्यासाठी पैसे घेतले जात असल्याबाबतची तक्रार आम्ही पोलीस अधीक्षक व मुख्यमंत्री यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले. परंतु मुख्यमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे या प्रकरणात क्लिनचिट दिल्यास न्यायालयात खटला दाखल करण्याचा इशाराही मलिक यांनी दिला.राज्यात भाजपाचे अवैध धंद्यांना संरक्षणजिल्ह्यात भाजपा जिल्हाध्यक्षांचा हा प्रताप उघड झाला असताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातून वाळूची वाहने सोडण्यासाठी काही दिवसांपूर्वी फोन केला गेला तर आमदार प्रशांत बंब यांनी गुटखा सोडण्यासाठी फोन केला होता. ही सारी परिस्थिती पाहता राज्यात भाजपा सरकार हे अवैध धंद्यांना पाठबळ देत असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. मलिक यांनी केलेल्या आरोपाबाबत प्रतिक्रियेसाठी वाघ यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.
भाजपा जिल्हाध्यक्षांनी घेतला अवैध धंद्यांसाठी प्रोटेक्शन मनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 5:45 AM