लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपाच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेला सत्तासंघर्ष अधिक रंजक होत चालला आहे. बुधवारी सकाळी महापौर व उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडून महापौरपदासाठी जयश्री महाजन व उपमहापौरपदासाठी कुुलभूषण पाटील या दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्यानंतर, दुपारी १ वाजेच्या सुमारास भाजपकडूनदेखील दोन्ही पदांसाठी प्रत्येक दोन-दोन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. महापौरपदासाठी भारती सोनवणे व प्रतिभा कापसे यांचे, तर उपमहापौरपदासाठी मयूर कापसे व सुरेश सोनवणे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मात्र, यापैकी कोणते उमेदवार निश्चित राहतील याबाबतचा तिढा अद्याप सुटलेला नाही.
भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिली चार नावे
महापौर व उपमहापौरपदासाठी कोणाला संधी द्यावी, याबाबत चर्चा करण्यासाठी बुधवारी सकाळी भाजप नेते गिरीश महाजन यांच्या जळगावातील जीएम फाउण्डेशनच्या कार्यालयात भाजपचे स्थानिक नेते व कार्यकर्ते जमले होते. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर काही नावे गिरीश महाजन यांच्याकडे पाठवण्यात आली आणि निर्णय महाजन यांच्यावर सोपविण्यात आला. महाजन यांनी महापौरपदासाठी विद्यमान महापौर भारती सोनवणे व प्रतिभा कापसे यांनी, तर उपमहापौरपदासाठी सुरेश सोनवणे व मयूर कापसे यांनी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार या चारही उमेदवारांनी दुपारी १ वाजता आपले अर्ज दाखल केले.
उद्यापर्यंत जो दहा नगरसेवक आणेल, त्याचे नाव फायनल?
भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप नेते गिरीश महाजन यांनी महापौर व उपमहापौरपद हव्या असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना एक अट घालून दिली आहे. २७ नगरसेवक फुटल्याने भाजप अल्पमतात आहे. सध्या भाजपकडे ३० नगरसेवक आहेत. पण त्यातूनही काही जण नॉट रिचेबल आहेत. अशा परिस्थितीत आवश्यक असलेला बहुमताचा ३८ हा आकडा गाठण्यासाठी भाजपला ८ नगरसेवक हवे आहेत. पण खबरदारी म्हणून पूर्ण १० नगरसेवक उद्यापर्यंत जो आपल्या बाजूने आणेल, त्याचे नाव महापौर व उपमहापौरपदासाठी अंतिम असेल, अशी अट गिरीश महाजन यांनी घालून दिली आहे. एकंदरीतच भाजपची वाट बिकट मानली जात आहे.