जळगाव - खोट बोल पण नेटाने बोल ही म्हण तंतोतंत शिवसेनेचे संजय राऊत यांना लागू पडते. संजय राऊत आरोपांच्या बाबतीत नुसत्याच डरकाळ्या फोडत असतात. ते जे बोलताहेत ते कुठे सत्य झालं का? नुसत्याच वल्गणा करायच्या, प्रसिध्दीसाठी मोठ मोठ्याने बोलायच एवढंच काम संजय राऊत यांना येतं या शब्दात भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना टीकेचे लक्ष केले आहे.
बेकायदेशीपणे एकही रुपया अथवा जमीन सापडली तर मी भाजपला दान करुन देईन, असे वक्तव्य ईडीने केलेल्या कारवाईनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यावर जामनेर येथे निवासस्थानी भाजपचे नेते गिरीश महाजन हे पत्रकारांशी बोलत होते. सगळी चौकशी होईल, सगळे पेपर समोर येतील, तेव्हा जनतेसमोर सर्व गोष्टी येतील, त्यामुळे खासदार संजय राऊत हे काहीही बोलत असले तरी त्या गोष्टीला आता अर्थ उरलेला नाही.
काही तरी असल्याशिवाय ईडी कारवाई करणार नाही, माझा खून होणार आहे अस तोंडात येईल ते वाट्टेल ती काहीही बडबड आता संजय राऊत करताहेत, फाट्यावर मारतो अन् लाठ्यावर मारतो, असे राऊत यांनी म्हटलं तरी आता काहीही होणार नाही. आता संजय राऊत यांना कुठलीही सहानुभूती आता मिळणार नाहीये, या ईडीच्या कारवाईच्या निमित्ताने राऊत यांनी केलेले सर्व पाप आणि पुण्य हे जनतेच्या समोर आलेलं आहे, आता थोड थांबा. अस म्हणत गिरीश महाजन यांनी राऊत यांना एकप्रकारे इशाराही दिला आहे.
राज्यात आता कुठेही कायदा व सुव्यवस्था शिल्लक राहिलेला नाही, राज्याचे गृहमंत्रीच, मोठ मोठे पोलीस अधीकारी जेलमध्ये जावून बसले आहेत, अनेक चौकशीच्या फेऱ्यात आहेत. असे म्हणत भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारवरही टीकेची झोड उठवली. पोलीस बदल्याच्या बाबतीत मोठा बाजार मांडला गेला. आणि पैसे वसुल करण्याच्या भानगडीत हे पडले आहेत, अनेक मंत्री जेलच्या वाऱ्या करताहेत, इतकी वाईट परिस्थिती पहिल्यांदाच राज्यात झालीय, पोलिसांना बदल्यांसाठी मोठ्याप्रमाणावर पैसे मागितले जाताहेत, यामुळे त्यांच खच्चीकरण होतंय, गुंड मोकाट सुटले आहेत, एवढी विदारक परिस्थिती राज्याची आहे, मात्र हे पाहायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही असे म्हणत गिरीश महाजन यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्दयावर ठाकरे सरकारचा जोरदार समाचार घेतला.