लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर : भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अमर पाटील यांनी पंचायत समिती सदस्यपदाचा दिलेला राजीनामा अखेर सभापतींनी मंजूर केला आहे. पाटील यांनी ८ जानेवारीला दिलेला राजीनामा तीन महिने प्रशासनाकडे पडून होता. पाटील यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी भाजप नेत्यांनी केलेले प्रयत्न असफल ठरल्यानंतर सोमवारी सभापती जलाल तडवी यांनी राजीनामा मंजूर केल्याचे सांगण्यात आले.
पाटील हे पंचायत समितीत भाजपचे गटनेते होते. निर्णय घेताना त्यांना विचारात घेतले जात नव्हते. एक वरिष्ठ नेताच कारभार चालवत असल्याने कंटाळून त्यांनी राजीनामा दिला. मध्यंतरी सभापती व उपसभापती निवड झाली. मात्र या दोन्ही वेळेस ते बैठकीला उपस्थित नव्हते. पाटील हे हिवरखेडे बुद्रुक येथील रहिवासी असून ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार निश्चितीवरून त्यांचे नेत्यांशी मतभेद झाले होते.
आपण राजकीय संन्यास घेत असून यापुढे सक्रिय राजकारण न करता सामाजिक काम करणार असल्याचे त्यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. भाजप सदस्यपदाचा देखील राजीनामा देणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.