जळगाव - आयपीएलवर आॅनलाईन सट्टा घेतल्याच्या संशयावरुन चोपडा येथील घनश्याम अग्रवाल यांना रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलिसांनी शनिवारी चोपडा येथून ताब्यात घेतले. अग्रवाल यांच्याविरुध्द खालापूर पोलीस स्टेशनला आयपीएलवर सट्टा घेवून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यांना रविवारी खालापूर (जि. रायगड) न्यायालयात हजर केले असता ९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक महेंद्र शेलार यांचे एक पथक शनिवारी सकाळीच सात वाजता चोपडा शहरात दाखल झाले. चोपडा शहर पोलीस स्टेशनची मदत घेऊन त्यांनी घनश्याम अग्रवाल यांना घरातूनच ताब्यात घेतले. कारवाई पूर्ण होईपर्यंत याबाबत कुठेच वाच्यता झाली नाही. अग्रवाल यांच्यावर आॅनलाईन सट्टा घेणे व आयपीएल सट्टा प्रकरणात फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. अग्रवाल यांचे नाव पुढे आल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांचे एक पथक रात्रीच चोपड्याकडे रवाना झाले. पोलीस निरीक्षकांना फोनवरुनच दिली माहिती खालापूरचे पोलीस पथक कारवाईसाठी चोपडा शहरात दाखल झाल्यानंतर त्यांनी पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना फोनवरुनच माहिती दिली.
अग्रवाल यांना ताब्यात घेतल्यानंतर स्टेशन डायरीला नोंद करण्यात आली. दरम्यान, या कारवाईबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आली. दरम्यान, अग्रवाल हे चोपडा शहरातील दिग्गज नावातील एक नाव आहे. सत्ताधारी पक्षातील एका बड्या नेत्याशी त्यांची जवळीक आहे. त्यांना रायगड पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चोपडा शहरात चर्चेचा उधान आले.