- प्रशांत भदाणे
जळगाव- भाजपा नेते गिरीश महाजनांचा पीए अरविंद देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता राहुल पाटील यांच्यात राज्यसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून एक लाख रुपयांची पैज लागली होती. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार जिंकणार असं सांगत अरविंद देशमुख यांनी चॅलेंज केलं होतं. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी लाखांच्या पैजेचं आव्हानही दिलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया सेलचे जळगावातील पदाधिकारी राहुल पाटील यांनी अरविंद देशमुख यांचं आव्हान स्वीकारलं. मात्र राहुल पाटील पैज हरला. त्यामुळे राहुलने शनिवारी दुपारी एक लाख रुपयांचा धनादेश अरविंद देशमुख यांना देण्यासाठी गिरीश महाजनांच्या जी. एम. फाउंडेशन या कार्यालयात आणला होता. पण अरविंद देशमुख यांनी एका कार्यकर्त्याचा सन्मान म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश राहुल पाटलांना परत केला. अरविंद देशमुख आणि राहुल पाटील यांच्यातल्या पैजेची राज्यभर चर्चाही रंगली होती
गिरीश महाजन यांनी यापूर्वी झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये राजकीय गणितांची जुळवाजुळव यशस्वीपणे केली आहे. आताही राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती. त्यामुळं भाजपला निश्चित यश मिळेल, हा विश्वास असल्याने मी पोस्ट केली होती. मुळात ही पैज मी पैशांसाठी लावली नव्हती. म्हणून पैज जिंकल्यानंतर मी राहुल पाटील यांना धनादेश परत केला. एक सच्चा कार्यकर्ता म्हणून राहुल यांचा मला अभिमान वाटला. -अरविंद देशमुख, गिरीश महाजनांचे पीए
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आपला दृढ विश्वास आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांचे डावपेच यशस्वी होतील, हा विश्वास होता. तो सार्थ ठरला, पण दुर्दैवाने संजय पवारांचा पराभव झाला. पैज हरल्यानं मी पैसे द्यायला आलो होतो, पण अरविंद देशमुख यांनी मोठ्या मनाने मला धनादेश परत केला. -राहुल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता