वरणगाव, ता. भुसावळ : नगर पंचायतीच्या प्रशासकीय राजवटीत करवाढ करण्यास भाजपने स्पष्ट विरोध दर्शविला आहे. करवाढ केल्यास जनआंदोलन करणार असल्याची भूमिका भाजपचे घेतली आहे, तसे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.
वरणगावकरांना हल्ली क्षेत्रफळानुसार ०४ स्वेअर मीटरप्रमाणे घरपट्टी व एक हजार रुपये पाणीपट्टी असा कर आकारला जात आहे. हीच घरपट्टी व पाणीपट्टी भरताना नागरिकांना परवडत नसून, आर्थिक गणित बिघडत आहे. वरणगाव शहरात शेतकरी व शेतमजुरांची संख्या मोठी आहे. त्यात कोरोना महामारीने जनता त्रस्त झाली आहे. अशावेळी नगर परिषद प्रशासनातर्फे घरपट्टी व पाणीपट्टीत वाढ करण्याचा घाट घातला जात आहे. वरणगावकरांच्या घरपट्टी व पाणीपट्टीच्या करात एक रुपयासुद्धा वाढ करू नये. करांमध्ये थोडी जरी वाढ केली तर वरणगाव शहरातील जनतेला सोबत घेऊन भाजप जनआंदोलन करील. करामध्ये वाढ करण्यास भाजपचा कडाडून विरोध आहे. अशा प्रकारचे निवेदन मुख्याधिकारी समीर शेख यांना भाजपच्या वतीने देण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजप शहराध्यक्ष सुनील माळी, माजी उपनगराध्यक्ष शेख अखलाक, महिला शहराध्यक्ष प्रणीता पाटील-चौधरी, हाजी अल्लाउद्दीन, गोलू राणे, नामदेव पहेलवान, शामराव धनगर, मिलिंद मेंढे, संदीप वाघ, नटराज चौधरी, हितेश चौधरी, रामदास माळी, रॉक कश्यप, कृष्णा माळी, संदीप माळी, मिलिंद भैसे, सुभाष धनगर, डॉ. प्रवीण चांदणे, संदीप माळी, इरफान पिंजारी, पप्पू ठाकरे, गजानन वंजारी, जावेद शहा, डी.के. खाटिक, आकाश निमकर, साबीर कुरेशी, शंकर पवार, युसूफखान, शेख फहीम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, सहायक संचालक कर विभाग, आमदार गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे यांच्याकडे पाठविल्या आहेत.