जळगाव - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' सुरू झाली आहे. सुमारे 3,500 किमी लांबीची ही भारत-जोडो यात्रा 12 राज्यांमधून जाणार आहे. सत्तेचा सर्वोच्च शिखर अनुभवलेल्या काँग्रेसची आज दयनीय अवस्था झाली आहे, देशभरात पक्ष अंतर्गत आणि बाह्य संघर्षाचा सामना करत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींना (Congress Rahul Gandhi) या यात्रेतून मोठ्या आशा आहेत. याच दरम्यान राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (BJP Radhakrishna Vikhe Patil) यांची राहुल गांधींवर घणाघाती टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेची उडवली खिल्ली आहे. "राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा करण्याऐवजी काँग्रेस छोडो जो कार्यक्रम सुरू आहे, त्याची चिंता करायला हवी" असं म्हटलं आगे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज जनावरांवरील लम्पी स्किन आजाराच्या पाहणीसाठी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे. तसेच माझे कुटुंब, तुमची जबाबदारी, सत्ता गेल्याचं वैफल्य असं म्हणत विरोधकांवरही जोरदार निशाणा साधला आहे.
"सत्ता गेल्याचं वैफल्य काही लोकांना आलंय"
"सत्ता गेल्याचं वैफल्य काही लोकांना आलंय, त्यामुळे ते वैफल्यातून राज्य सरकारवर टीका करत आहेत, त्यांच्याकडे आपण फार लक्ष द्यायची गरज नाही. प्रत्येक विरोधकाच्या टीकेला उत्तर दिलं पाहिजे असं काही नाही. राज्य सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे काम करत आहे, चांगले निर्णय घेत आहे. सरकार म्हणून आम्ही जनतेची जबाबदारी घेतली, मागच्या सरकारसारखं आम्ही माझे कुटुंब तुमची जबाबदारी यासारखं वागणार नाही" असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
"भारत जोडो यात्रा म्हणजे गांधी घराण्याची कुटुंब वाचवण्याची मोहीम"
"भारत जोडो यात्रा" या मोहिमेवर भाजपाने हल्लाबोल केला आहे. भारत जोडो यात्रा म्हणजे गांधी घराण्याची कुटुंब वाचवण्याची मोहीम आहे अशा शब्दांत बोचरी टीका केली. तसेच पक्षावर गांधी कुटुंबाचे नियंत्रण ठेवण्यासाठी आणि राहुल गांधी यांना नेता म्हणून स्थापित करण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे असं टीकास्त्रही सोडलं आहे. भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.
"सध्या काँग्रेसचे अनेक नेते पक्षाला सोडून जात असताना राहुल गांधी स्वत: पक्षाचे एकीकरण करू शकले नाहीत आणि ते आता भारत जोडो मोहीम चालवत आहे. ही एक कुटुंब वाचवण्याची मोहीम आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जात असताना कुटुंबाचा आणि पक्षाचा राजकीय विस्तार कमी होत चालला आहे. हे देशाला एकत्र आणण्यासाठी नाही तर राहुल गांधी यांना पुन्हा पक्षाचा प्रमुख नेता म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे" असं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.