जामनेर : ग्रामपंचायतपासून लोकसभेपर्यंत भाजपला साथ देणाऱ्या जामनेर मतदारसंघात जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेसने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. उमेदवारी कुणाला मिळते यावर लढतीचे स्वरुप ठरणार असले तरी यावेळेस इच्छुकांमध्ये चांगलीच स्पर्धा असेल हे निश्चित आहे.लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रक्षा खडसे यांना मतदारसंघातून ४५ हजार मतांची आघाडी मिळाल्याने कार्यकर्ते निर्धास्त असले तरी चिंतामुक्त नाही. कारण मंत्री महाजन यांनी दिलेले लाखाचे मताधिक्य मिळवून देण्याचे आश्वासन पूर्ण होऊ शकले नाही. शहरातून घटलेली मतांची आघाडी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांसाठी आव्हान ठरले आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते कामाला लागल्याचे दिसत आहे.जामनेर, शेंदुर्णी नगरपालिका निवडणुकीत पराभव सहन करावा लागला असला तरी नाऊमेद न होता सत्ताधाऱ्यांविरोधात लढणाºया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात लोकसभा निवडणुकीत सुमारे ७० हजार मते पारड्यात पाडून घेतली. यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढल्याचे दिसते.रावेर मतदारसंघ काँग्रेसकडे गेल्याने जामनेरची जागा राष्ट्रवादीलाच मिळेल हा आत्मविश्वास असल्याने व काँग्रेसकडूनही फारसा विरोध होण्याची शक्यता नसल्याने इच्छुक असलेले संजय गरुड तयारीला लागल्याचे दिसत आहे.विधानसभा लढविण्याची पूर्वतयारी म्हणून गरुड व त्यांचे समर्थक जनतेच्या समस्येवर विविध जनआंदोलन करीत आहेत. अभिषेक पाटील हे दीड वर्षांपूर्वी तालुक्याच्या राजकारणात सक्रिय झाले होते व त्यांनी युवकांचे संघटन वाढवले. उमेदवारीसाठी ते इच्छुक असून, वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत.आघाडीला चांगले दिवसदरम्यान, तालुक्यात राष्ट्रवादीला चांगले दिवस येत असून, या निवडणुकीत पक्षाने कोरी पाटी असलेल्या कार्यकर्त्यास संधी दिल्यास चित्र वेगळे असेल असे बोलले जात आहे.साडेचार वर्षे सत्तेत राहूनदेखील विरोधकांसारखी वागल्याने युती होणार नाही, अशी शक्यता गृहीत धरुन शिवसेनेतील स्थानिक इच्छुक विधानसभा लढण्याच्या तयारीत होते. मात्र नेत्यांच्या गळाभेटीनंतर युती झाल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला.भाजपात महाजन यांच्याशिवाय उमेदवारीसाठी सध्या कुणीही प्रबळ दावेदार नसल्याने युतीचे तेच उमेदवार असतील यात शंका नाही. विकास कामांच्या बळावर व संघटन शक्तीच्या जोरावर भाजप निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहे.
भाजप निवडणुकीस सज्ज, राष्ट्रवादीत इच्छुकांची भाऊगर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 10:14 PM