लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी ऑनलाईनऐवजी सभागृहात प्रत्यक्ष मतदान घ्यावे, यासाठी औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवर बुधवारी (दि. १७) न्या. संजय गंगापूरवाला व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. दरम्यान, याबाबत भाजपकडून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनाही निवेदन देण्यात आले आहे. भाजपकडून आलेला प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडेही पाठविला आहे.
राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुका प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहून घेतल्या. मग जळगाव महापालिका अपवाद कशासाठी, असा प्रश्नही याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला आहे. विश्वासार्ह आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक व्हावी, यासाठी प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहून मतदान घ्यावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. रंजना विजय सोनार आणि विश्वनाथ सुरेश खडके यांनी विभागीय आयुक्त व मनपा आयुक्तांच्या ५ मार्च २०२१ रोजीच्या ऑनलाइन निवडणुकीच्या घोषणेला आव्हान दिले आहे. महापौर व उपमहापौरांची निवडणूक १८ मार्चला ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे संबंधित पत्रात म्हटले आहे. ऑनलाईन निवडणूक घेण्यासंबंधीचा ३ जुलै २०२० व ९ सप्टेंबर २०२० रोजीचे नगर विकास विभागाच्या अवर सचिवांचे आदेश विषय समिती व सर्वसाधारण सभेसंबंधीचे असल्याचे याचिकाकर्त्यांनी नमूद केले आहे. संबंधित आदेश २१ डिसेंबर २०२०च्या पत्राद्वारे मागे घेण्यात आले आहेत. महापौर व उपमहापौर निवडणूक प्रत्यक्ष सभागृहात घेण्याचे आदेश असून, पिंपरी चिंचवड आणि नागपूर मनपाच्या निवडणुका सभागृहात नुकत्याच झाल्या आहेत. त्यामुळे जळगाव मनपाची निवडणूक ऑनलाइन घेणे चुकीचे आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे.
याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड.अमरजितसिंह गिरासे, ॲड. योगेश बोलकर, ॲड. ज्ञानेश्वर बागुल व ॲड. विष्णू मदन पाटील काम पाहत आहेत.
भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकात्यांची भेट
याबाबत भाजपचे गटनेते भगत बालानी, नगरसेवक विशाल त्रिपाठी व जिल्हा महानगर सरचिटणीस डॉ.राधेश्याम चौधरी यांनी सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ही सभा ऑफलाईन पद्धतीने घेण्याची मागणी केली आहे.