लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक ही ऑफलाइन पद्धतीने व्हावी, याबाबत भाजपकडून औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती भाजपचा अधिकृत सूत्रांनी दिली आहे, तसेच याबाबत भाजपकडून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनाही निवेदन देण्यात आले आहे. भाजपकडून आलेला प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडेही पाठविला आहे.
महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीआधी भाजपमध्ये उभी फूट पडल्यामुळे निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत शिवसेनेकडे ४४ नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचे सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. तर भाजपकडूनही बहुमत पूर्ण मिळेल, असा दावा केला जात आहे. मात्र, महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक ही ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याने सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सभा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. मात्र, ही सभा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात यावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. याबाबत भाजपचे गटनेते भगत बालानी, नगरसेवक विशाल त्रिपाठी व जिल्हा महानगर सरचिटणीस डॉ.राधेश्याम चौधरी यांनी सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ही सभा ऑफलाइन पद्धतीने घेण्याची मागणी केली आहे, तसेच भाजपने औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल केली आहे.
ऑनलाइन सभा झाल्यास भाजपला बसू शकतो फटका
ऑनलाइन सभा झाल्यास नगरसेवक आहेत, त्या ठिकाणावरूनही सभेत सहभागी होऊ शकतात, ज्यामुळे फुटलेल्या नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यात भाजपला अपयश येण्याची शक्यता आहे, तर ऑनलाइन सभा झाल्यास शिवसेनेला यामुळे काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. आता ऑफलाइन व ऑनलाइन सभेवरून दोन्ही पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत.