लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव- मनपातील भाजपच्या चारही स्वीकृत नगरसेवकांचा राजीनामा घेण्याचा मुहूर्त अखेर भाजपला सापडला असून, याबाबत शनिवारी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपच्या नगरसेवकांची बैठक होणार असून, या बैठकीत संबंधित नगरसेवकांकडून राजीनामे घेण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
महापालिकेत सत्ता आल्यानंतर महापौर-उपमहापौर पदासह स्वीकृत नगरसेवकांचे पददेखील दहा महिन्यांसाठी देण्याचे निश्चित करण्यात आले होते; मात्र अडीच वर्ष होऊनदेखील स्वीकृत नगरसेवकांचे राजीनामे घेण्यात न आल्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपमध्ये अनेक जण इच्छुक असून, गेल्या वर्षभरापासून इच्छुकांकडून मोर्चेबांधणी करण्यात येत होती; मात्र काही ना काही कारणासाठी राजीनामा घेणे भाजपकडून टाळले जात असल्याने आता भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात महापालिकेची सत्तादेखील भाजपने गमावली असून, भाजपच्या २७ नगरसेवकांनी भाजप विरोधात उघड बंडखोरी केली होती. आता स्वीकृत नगरसेवकांच्या मुद्द्यावरून भाजपचे संघटनेतील अनेक पदाधिकारी नाराज झाले आहेत. अनेक पदाधिकाऱ्यांना भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पदाबाबत आश्वासित करण्यात आले होते; मात्र अजूनही स्वीकृत नगरसेवकांचे राजीनामे घेण्यात आले नसल्याने भाजप महानगरमध्ये अंतर्गत धुसफूस वाढल्याने अखेर माजी मंत्री गिरीश महाजन यांनी यावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी बैठकीचे आयोजन केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महापालिकेचा घेणार आढावा
जळगाव महापालिकेतील सत्ता गमावल्यानंतर माजी मंत्री गिरीश महाजन शनिवारी पहिल्यांदाच जळगाव मनपातील नगरसेवकांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत महापालिकेतील आगामी रणनीतीबाबतदेखील आढावा घेणार आहेत, तसेच बंडखोर नगरसेवकांचा अपात्रतेच्या प्रस्तावाबाबतदेखील माहिती घेऊन पुढील धोरणाबाबत या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेकडूनदेखील इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू
शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक अमर जैन यांनी राजीनामा देऊन दोन महिन्याच्या वर काळ झाला आहे; मात्र शिवसेनेने अद्यापही स्वीकृत नगरसेवकाबाबत कोणत्याही नावाची घोषणा केली नाही. एका जागेसाठी शिवसेनेकडूनदेखील अनेक जण इच्छुक आहेत. यामध्ये जाकिर पठाण, गजानन मालपुरे, नीलेश पाटील व विराज कावडीया यांचे नाव आघाडीवर आहे.
कोट
शनिवारी जळगाव शहरात येणार असून, याबाबत काही पदाधिकाऱ्यांशी चर्चादेखील केली जाणार आहे. स्वीकृत नगरसेवकांबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. मध्यंतरी हा विषय बारगळला होता.
-गिरीश महाजन, आमदार.